भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढाई असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतील Gujarat Elections 2017 अखेरच्या टप्प्यातील मतदानाला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. या टप्प्यात ९३ जागांसाठी ८५१ मतदार रिंगणात असून भाजपसमोर आव्हान उभे करणारे ओबीसी नेता अल्पेश ठाकूर व दलित नेता जिग्नेश मेवाणी यांचेही भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमधील विधानसभा निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकूर व दलित नेता जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांनी भाजपसमोर आव्हान निर्माण केले. राहुल गांधी यांच्या प्रचारसभांनाही अनपेक्षित प्रतिसाद मिळाला होता. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या. राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड लागल्यावर ही पहिलीच निवडणूक असल्याने काँग्रेसनेही कंबर कसली. यामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये ३० पेक्षा जास्त प्रचारसभा घ्याव्या लागल्या.

गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर विक्रमी मतदान झाले होते. जवळपास ६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होत असून यात अहमदाबाद, बडोदा यासारख्या शहरांचा समावेश आहे. २०१२ च्या निवडणुकीत ९३ पैकी ५२ जागांवर भाजपचा विजय झाला होता. तर काँग्रेसला ३९ जागांवरच समाधान मानावे लागले होते. गेल्या निवडणुकीत अहमदाबाद, बडोदा या शहरांमधील २३ पैकी २० जागांवर भाजपचे आमदार निवडून आले होते. त्यामुळे या दोन्ही शहरांमधील बालेकिल्ला टिकवणे भाजपला जड जाणार नाही, असे दिसते. दुसरीकडे अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांचे भवितव्यही आज मतपेटीत बंद होणार आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि काँग्रेसचे जिवाभाई पटेल यांच्यात मेहसाणात अटीतटीची लढत आहे.

Live Updates:

* गुजरातमधील मतदानाची वेळ संपली

* वडोदरा, मेहसाणा, आणंद येथे भाजप – काँग्रेस कार्यकर्ते भिडले

*  आमच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार आली आहे, आम्ही याची सविस्तर चौकशी करुन पुढील कारवाई करु: गुजरातमधील निवडणूक आयुक्त

* मोदींच्या रोड शोविरोधात काँग्रेस आक्रमक, दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन

* दुपारी २ वाजेपर्यंत ४७.४० टक्के मतदान

* भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

* माजी क्रिकेटपटू नयन मोंगिया मतदान केंद्राबाहेर

* दुसऱ्या टप्प्यात दुपारी १२ वाजेपर्यंत ३९ टक्के मतदान

* मतदानानंतर मोदींचा मिनी रोड शो,  रस्त्याच्या दुतर्फा मोदी समर्थकांची गर्दी

*  नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क, साबरमतीतील राणिप मतदान केंद्रांवर केले मतदान.

* हार्दिक पटेल यांनी केले मतदान

* छोटा उदयपूरमधील एका गावात ईव्हीएममध्ये बिघात झाल्याने मतदान प्रक्रिया तासाभरासाठी थांबवण्यात आली.

* अमित शहा यांनी अहमदाबादमधील नाननपूरा येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

* हार्दिक पटेल यांचा आई-वडिलांनी केले मतदान

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीने बजावला मतदानाचा हक्क

* हार्दिक पटेल यांची आज ‘परीक्षा’, मुलाच्या यशासाठी आईवडिलांचे देवाला साकडे

* गुजरातमधील दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी मतदानाला सुरुवात