आगामी विधानसभा निवडणुकीनंतर गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार येईल. हे सरकार आताच्या सरकारप्रमाणे ‘मन की बात’ करणारे नव्हे तर लोकांच्या मनातील गोष्टी ऐकणारे असेल, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. ते शुक्रवारी पोरबंदर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित मच्छिमार समूहाच्या समस्या मांडत मोदी सरकारला लक्ष्य केले. राहुल यांनी म्हटले की, सध्या राज्यातील मच्छिमारांना जल प्रदूषणामुळे मासे पकडण्यासाठी लांबच्या अंतरापर्यंत जावे लागते. मात्र, या प्रदूषणासाठी कोण जबाबदार आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहित तर मी सांगतो. या प्रदूषणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मर्जीतील उद्योगपती कारणीभूत आहेत. आगामी निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आल्यास मच्छिमारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कृषी खात्याप्रमाणे मत्स्य मंत्रालय स्थापन करू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

काँग्रेसच्या काळात मच्छिमारांना डिझेलासाठी ३०० कोटींचे अनुदान दिले जात होते. मात्र, भाजपची सत्ता आल्यानंतर ते थांबवण्यात आले. सरकारच्या डोक्यावर कर्ज झाले तरी काँग्रेसने हे अनुदान सुरू ठेवले होते. मात्र, भाजपकडून तसे केले जात नाही. मात्र, त्यांच्याकडून उद्योगपतींची १ लाख कोटींपेक्षा जास्त रक्कमेची कर्जे माफ केली जातात. भाजपचे अनेक कार्यकर्ते आमच्याकडे येऊन अमुक समस्या असल्याचे सांगतात. मात्र, राज्यात सरकार तुमचे आहे, पंतप्रधान तुमचे आहेत , मुख्यमंत्री तुमचे आहेत तर या समस्या का सोडवल्या जात नाहीत?, असा प्रश्न मला पडतो. ही सर्व परिस्थिती पाहता गुजरातमध्ये काँग्रेसचेच सरकार येईल, अशा आशावाद राहुल यांनी व्यक्त केला.