गुजरातमध्ये काँग्रेसमधील आमदारांना फोडून गांधी घराण्याचे निकटवर्तीय अहमद पटेल यांचा राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव करण्याचा डाव भाजपने आखला आहे. गेल्या दोन दिवसांत गुजरात काँग्रेसमधील पाच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून अहमद पटेलांचा पराभव करुन गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

गुजरात काँग्रेसमधील अंतर्गत कलह शिगेला पोहोचला असून नाराज आमदारांनी आता पक्षाला रामराम ठोकायला सुरुवात केली आहे. आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी काँग्रेसचे आमदार मानसिंह चौहान आणि छनाभाई चौधरी या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी गुरुवारी बलवंतसिह राजपूत, तेजश्री पटेल आणि प्रल्हाद पटेल या तिघांनी काँग्रेसला रामराम केला होता. गुजरात विधानसभेतील पाच आमदारांनी राजीनामा दिल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष रमणलाल वोरा यांनी दिली.

गुजरातमधील पाच आमदारांनी भाजपच्या गोटात प्रवेश केल्याने काँग्रेसचे संख्याबळ ५२ वर घसरले आहे. तर गुजरातमध्ये राज्यसभेत जाण्यासाठी अहमद पटेल यांना ४८ मतांची गरज आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे बलवंतसिंह राजपूत या राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अमित शहा, स्मृती इराणी यांच्यानंतर गुजरातमधून राज्यसभेसाठी राजपूत हे तिसरे उमेदवार आहेत. अहमद पटेल हे सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार म्हणून ओळखले जातात. अहमद पटेल यांचा पराभव झाल्यास काँग्रेसची नाचक्की होईल आणि गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी हा मोठा हादरा असेल.

गुजरातमध्ये यापूर्वी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून चेहरा जाहीर करण्यास नकार दिल्याने गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी गेल्या आठवड्यात पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही गुजरातमध्ये काँग्रेसमधील मते फुटली होती. काँग्रेसच्या ११ आमदारांची मते फोडण्यात भाजपला यश आले होते.