मुस्लिमांचा धर्मग्रंथ असणाऱ्या कुराणाचा दाखला देत गोमांस प्रकृतीसाठी अपायकारक आहे, अशा आशयाचे फलक सध्या अहमदाबादमध्ये झळकत आहेत. या फलकांवर गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे छायाचित्र असून फलकाच्या अन्य भागात मुस्लिम धर्माचे प्रतिक असलेला अर्धाकृती चंद्र आणि सितारा छापण्यात आला आहे. गुजरात प्रशासनाच्या गौसेवा आणि गौचर महामंडळाकडून लावण्यात आलेल्या या फलकावर कुराणातील एक वचन उद्धृत करण्यात आले आहे. या वचनानुसार कुराण गायींचे रक्षणाचे समर्थन करते, असा संदेश या फलकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. गाय ही सर्व गोवंशीय प्राण्यांचे नेतृत्व करते, त्यामुळे आपण तिचा आदर केला पाहिजे. याशिवाय, गायीपासून आपल्याला दूध, तूप आणि लोणी यांसारखे रोगाचे निवारण करणारे पदार्थ मिळतात. याउलट गायीचे मांस खाल्ल्याने विविध आजार होतात, असा संदेश या फलकावर लिहण्यात आला आहे.
मात्र, हा दावा गुजरातमधील मुस्लिम धर्मगुरूंकडून फेटाळण्यात आला आहे. कुराणात असे कोणतेही वचन नाही. कदाचित, अरबी भाषेतील एखादे वचन चुकून कुराणात समाविष्ट झाल्यामुळे असे घडले असावे. मात्र, आता या सगळ्याचा उपयोग मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्यासाठी होत असल्याचा आरोप मुफ्ती अहमद देवलावी यांनी केला.