गुजरात हे भारतासाठी जागतिक प्रवेशद्वार असल्याचे सांगत येथे सुरू असलेल्या वायब्रंट गुजरात संमेलनाचा उपयोग उपस्थित सर्व उद्योग धुरिणांनी जगाला सकारात्मक संदेश देण्यासाठी करावा, असे उद्गार गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काढले. वायब्रंट गुजरात संमेलन २०१३ ला शुक्रवारी सुरुवात झाली. या वेळी त्यांनी जगासमोर चुकीचा संदेश जाता कामा नये, असे प्रतिपादन यांनी केले.
एकेकाळी गुजरात हे जगासाठी प्रवेशद्वार होते. मात्र आता गुजरात भारतासाठी जागतिक प्रवेशद्वार झाले आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला गुजरात घरासारखे वाटावे, अशी परिस्थिती निर्माण करायची असल्याचे मोदी यांनी या वेळी सांगितले.
वायब्रंट गुजरात संमेलन हे केवळ गुंतवणुकीबाबतच नाही तर सकारात्मक आर्थिक वातावरण तयार करून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळले, याची हमी देणारे आहे. या संमेलनाचा उद्देश आंतरराष्ट्रीय समूदाय आणि स्थानिक यांना एकत्र आणून आर्थिक प्रक्रिया राबवणे असा असल्याचे मोदी यांनी सांगितले.
शोषण करणारे आर्थिक प्रारूप हे योग्य पद्धतीने काम करीत नसल्याचा अनुभव असल्याचे इतिहासावरून दिसते. मात्र  हा चुकीचा समज खोडून काढायचा असल्याचे ते म्हणाले.
अंबानी बंधुंची स्तुतिसुमने
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर शुक्रवारी अंबानी बंधूंनी स्तुतिसुमनांचा वर्षांव केला. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी, मोदी हे द्रष्टे नेते असल्याचे नमूद केले तर अनिल अंबानी यांनी, मोदी यांना म. गांधी आणि सरदार पटेल यांच्या पंक्तीत बसविले. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने द्रष्टा नेता लाभला असून पायाभूत सुविधांमध्ये गुजरात हे राज्य संस्थापक आहे, असे मुकेश अंबानी यांनी ‘व्हायब्रण्ट गुजरात’ परिषदेत सांगितले.
आम्ही गुजरातमधूनच सुरुवात केली आणि पुन्हा येथेच परतलो आहोत. गुजरातमध्ये एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत आणि आमच्या उद्योगाचा विस्तार जामनगर आणि हजिरा येथे करण्यात येणार आहे. रिलायन्सला ‘गुजराती कंपनी’ असे संबोधणे हे अभिमानास्पद आहे, असे मुकेश अंबानी म्हणाले. पं. दीनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम विद्यापीठात ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.