गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांची आज दुपारी चार वाजता निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात येईल. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्यापूर्वीच विविध राजकीय पक्षांकडून निवडणुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजप दरम्यान मुख्य लढत होणार आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये नोव्हेंबरमध्ये एकाच टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी ४ नोव्हेंबरला निवडणूक आणि २० डिसेंबरला मतमोजणी करण्यात आली होती. हिमाचल प्रदेशमध्ये एकूण ६८ जागा आहेत. येथे गेल्यावेळी काँग्रेसने ३६ जागा जिंकल्या होत्या. इथे भाजपचा पराभव झाला होता. त्यांना २६ जागा मिळाल्या होत्या. भाजपने प्रेमकुमार धुमल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली होती. वीरभद्र सिंह येथे सहा वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.

तर दुसरीकडे गुजरात विधानसभेसाठी गेल्या वेळी १३ आणि १७ डिसेंबर रोजी निवडणूक आणि २० डिसेंबरला निकाल लागला होता. भाजपला येथे १८२ पैकी ११६ जागा मिळाल्या होत्या. गुजरातमध्ये ४८ टक्के मतदान तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने मिळवली होती. गुजरात हा भाजपचा गड मानला जातो. १९९८ पासून येथे भाजपची सत्ता आहे. गुजरातमध्ये ५० हजारहून अधिक मतदान केंद्रावर व्हीव्हीपीटी प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. या प्रणालीचा वापर याचवर्षी गोव्यात झालेल्या निवडणुकीत करण्यात आला होता.