इव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांकडून होत असतानाच मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. जोती यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. इव्हीएममध्ये फेरफार अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांमधील मतमोजणीला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. जोती यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. जोती म्हणाले, इव्हीएममध्ये फेरफार झालेली नाही. इव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर आम्ही त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. गुजरातमध्ये व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात आला,  कोणाला मत दिले हे मतदारांना  समजते, त्यामुळे फेरफारचे आरोप करणे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले.

अहमदाबादस्थित एका कंपनीचे १५० अभियंते मतदान यंत्रांत फेरफार करण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी रविवारी केला होता. पाच हजार मतदानयंत्रांत फेरफार करण्याचा कट असून देवाने तयार केलेल्या मानवी शरीरात बदल करता येतात तर मग मानवानेच तयार केलेल्या मतदानयंत्रात का बदल करता येणार नाहीत, अशी ट्विप्पणी हार्दिक यांनी केली होती. यापार्श्वभूमीवर जोती यांनी हे विधान केले आहे.

दरम्यान, गुजरातचा गड राखण्यात भाजपला यश मिळाले असले तरी त्यांना १५० जागांचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला हादरा देत भाजपने विजयी आघाडी घेतली आहे. हिमाचलमध्ये भाजप ४३ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस पक्ष २२ जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय, ८ जागांवर अन्य पक्षांनी आघाडी घेतली आहे. हिमाचल विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी एकूण ६८ जागांपैकी ३५ जागांवर विजय मिळवणे आवश्यक होते. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता बहुमताचा आकडा गाठणे भाजपला अवघड जाणार नाही, असे चित्र तुर्तास दिसत आहे.