देशात २२ वा क्रमांक

गुजरात हे प्रगत राज्य मानले जात असले तरी तेथे स्त्री-पुरूष यांचे तुलनात्मक प्रमाण सामाजिक दृष्टिकोनातून समाधानकारक नाही.  राज्य विधानसभेत मांडण्यात आलेल्या २०१५-१६ या वर्षांच्या सामाजिक आर्थिक आढाव्यातून ही बाब उघड झाली आहे. गुजरातेत २०११ च्या जनगणनेनुसार दर हजारी पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९१९ आहे व २००१ मध्ये हे प्रमाण ९२० इतके होते. राष्ट्रीय पातळीवर मात्र स्त्री-पुरूष गुणोत्तर १००० पुरूषांमागे ९४३ स्त्रिया असे आहे, म्हणजे राष्ट्रीय पातळीपेक्षा गुजरातेत हे प्रमाण कमी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गुजरातचा क्रमांक स्त्री-पुरूष प्रमाणात देशातील २८ राज्यांमध्ये २८ वा आहे. तेथील ग्रामीण भागात मात्र स्त्री-पुरूष प्रमाण तुलनेने चांगले आहे. २००१ मध्ये ग्रामीण भागात दहा हजार पुरूषांमागे ९४५ स्त्रिया होत्या. २०११ मध्ये हे प्रमाण ९४९ झाले. शहरी भागात दर हजार पुरूषांमागे ८८० स्त्रिया हे प्रमाण कायम राहिले आहे. मेहसाणा व सुरत वगळता हे प्रमाण उत्तर-दक्षिण भागात वाढले आहे, तर सौराष्ट्रात ते सुरेंद्रनगर व पोरबंदर वगळता थोडे कमी झाले आहे. तापी या आदिवासी जिल्ह्य़ात हे प्रमाण २०११ च्या जनगणनेनुसार १००७ आहे, डांग जिल्ह्य़ात १००६, तर दाहोदमध्ये ९९० तर सुरत जिल्ह्य़ात ७८७ व अहमदाबादेत ९०४ असे दर हजार पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण आहे. राज्यात व राज्याबाहेर स्थलांतराने स्त्रियांचे प्रमाण कमी दिसते आहे, असा युक्तिवादही करण्यात आला आहे.