पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर २०२० रोजी देशातील पहिल्या सीप्लेन सेवेचे उद्घाटन करण्यात आलं. केवडियामध्ये त्यांनी सीप्लेन सेवेसाठी वॉटर एरोडोमचं लोकार्पण केलं. सरदार सरोवर धरणाजवळच्या तळे क्रमांक ३ येथे या सेवेचे उद्घाटन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्ताने करण्यात आलं होतं. सरदार सरोवराजवळची सीप्लेन सेवा स्पाइस जेटची ‘स्पाइस शटल’ ही कंपनी चालवत आहे. परंतु सध्या काही कारणास्तव ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे.

“मालदीवरून विमान परतल्यानंतर सीप्लेन सेवा पुन्हा १५ डिसेंबरपासून पुन्हा सुरू केली जाणार आहे. दरम्यान, याबाबत यापूर्वीपासूनच ठरवण्यात आलं होतं. त्यामुळेच २७ नोव्हेंबर नंतर कोणत्याही प्रकारचं बुकींग घेण्यात आलं नव्हतं,” अशी माहिती स्पाईस जेटच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.

आतापर्यंत ८०० प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. दररोज दोन सीप्लेन उड्डाणांचं संचालन करण्यात येतं. या योजनेअंतर्गत एका मार्गाचं भाडं १ हजार ५०० रूपयांपासून सुरू होतं. तसंच ३० ऑक्टोबर २०२० पासून या सेवेसाठी बुकींग सुरू करण्यात आलं होतं. एका मार्गाचा प्रवास हा ३० मिनिटांचा आहे. स्पाईस जेटनं यासाठी मालदीवकडून एक सीप्लेन विकत घेतलं आहे. यामध्ये एकावेळी १२ प्रवासी प्रवास करू शकतात.

१६ सीप्लेन मार्गांची ओळख

साबरमती आणि सरदार सरोवर-स्टॅच्यू ऑफ यूनिटी मार्ग देशातील ओळख पटवण्यात आलेल्या १६ मार्गांपैकी एक आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार या मार्गांसाठी हायड्रोग्राफिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं आहे. यानंतर गुवाहाटी, अंदमान निकोबार आणि यमुनापासून उत्तराखंडसारख्या अन्य मार्गावरही ही सेवा सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे.