गुजरातमध्ये दिवसोंदिवस करोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. देशाप्रमाणेच गुजरातलाही करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. असं असतानाही येथील अहमदाबाद जिल्ह्यामधील एक धक्कादायक प्रकार व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समोर आला आहे. मध्य गुजरातमधील साणंद येथे एका गावातील महिला मोठ्या संख्येने एका धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर उतरल्या. डोक्यावर कलश घेऊन शेकडोच्या संख्येने जमलेल्या या महिलांनी रस्त्यावरुन चालत कलश यात्रा काढल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या व्हिडीओंमध्ये महिलांनी करोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याचं दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंगही न ठेवता गर्दी करुन या महिला रस्त्यावरुन चालताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसीार या महिला डोक्यावर कलश घेऊन बालियादेव मंदिरामध्ये जात होत्या. धक्कादायक बाब म्हणजे करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अहमदाबाद जिल्ह्यामध्येच हा प्रकार घडलाय.

साणंदमधील नवापुर आणि निर्धार्ध गावामध्ये पुजा करण्यासाठी मंगळवारी म्हणजेच ४ मे रोजी या महिला मोठ्या संख्येने एकत्र जमल्या होत्या. या महिलांनी करोनासंदर्भातील कोणतेच नियम पाळले नाहीत. त्यानंतर मंदिरात पोहचल्यानंतर मोठ्याने गाणी लावून या महिलांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती एएनआयशी बोलताना अहमदाबाद ग्रामीण पोलिसांचे उपअधीक्षक के.टी. कमारीया यांनी दिली आहे. या प्रकरणामध्ये आम्ही गावचे सरपंच आणि २३ जणांविरोधात कारवाई केलीय असं कमारीया यांनी स्पष्ट केलं. काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. मंगळवारी गुजरातमध्ये १३ हजार ५० नवे करोना रुग्ण आढळून आले. राज्यात एकूण १३१ रुग्णांचा मंगळवारी करोनामुळे मृत्यू झाला. गुजरातमध्ये आथापर्यंत करोनाचे ६ लाख २० हजार ४७२ रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण मरण पावलेल्यांची संख्या ७ हजार ७७९ इतकी आहे. गुजरातमधील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या म्हणजेच अॅक्टीव्ह रुग्णसंख्या १ लाख ४८ हजार २९७ इतकी आहे. राज्यातील अहमदाबाद जिल्हा हा करोनाने सर्वाधिक प्रभावित झालेला जिल्हा आहे. येथे करोनाचे १ लाख ८५ हजार ४३६ रुग्ण आढळून आलेत.