गुजरातमधील बनासकांठा येथे जमावाने केलेल्या मारहाणीत ५० वर्षांच्या चोरट्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनासकांठाजवळील हरीगढ गावात शनिवारी रात्री स्थानिकांनी ५० वर्षांच्या व्यक्तीला चोरीच्या संशयातून पकडले. जमावाने त्या व्यक्तीला झाडाला बांधून त्याला बेदम मारहाण केली. सुमारे ४० ते ५० जणांनी ही मारहाण केली असून या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अधिक तपास करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री एक व्यक्ती अमरत प्रजापती यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरला होता. त्याने घरातील एका वृद्ध महिलेकडील दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. वृद्धेने मदतीसाठी हाक मारताच कुटुंबातील अन्य सदस्य तिथे पोहोचले. त्यांनी संशयित चोरट्याला पकडले. यानंतर संशयित चोरट्याला गावातील एका झाडाला बांधून ठेवले आणि अन्य ग्रामस्थांच्या मदतीने त्याला मारहाण केली, असी माहिती पोलीस अधीक्षक प्रदीप सेजूल यांनी दिली. अमरत प्रजापती, शिवा प्रजापती, दशरथ प्रजापती, जयंती प्रजापती आणि बाबू प्रजापती अशी या अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.