गुजरातच्या चार शहरांमध्ये १५ फेब्रुवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी कायम राहणार आहे. राज्य सरकारने शनिवारी ही माहिती दिली.अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि राजकोट या चार शहरांमध्ये रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहिलं. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. “करोना व्हायरसमधून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९४ टक्के आहे. पण तरीही सावध आणि सतर्क राहण्याची आवश्यकता आहे” असे गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) पंकज कुमार म्हणाले.

गुजरातेत लग्नामध्ये पाहुण्यांची संख्या वाढवायलाही परवानगी दिली आहे. आधी १०० जणांना परवानगी होती आता २०० पाहुण्यांना निमंत्रित करता येईल. ट्रेन, हवाई प्रवास आणि मेट्रो मार्गाने होणाऱ्या प्रवासी संख्येवर सरकारचे बारीक लक्ष असल्याचे पंकज कुमार यांनी सांगितले. गुजरामध्ये दिवाळीनंतर करोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती.

सुरुवातीला अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि राजकोट या चार शहरांमध्ये रात्री १० ते सकाळी सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. गुजरात सरकारच्या आरोग्य विभागानुसार, गुजरातमध्ये ३,५८९ सक्रीय करोना रुग्ण आहेत. गुजरातेत आतापर्यंत २ लाख ६० हजार ९०१ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यात ४,३८५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.