मुख्यमंत्री असताना मोदींनी गुजरातच्या विकासासाठी केलेल्या कामांपेक्षा सध्या ते पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतरही अधिक काम करीत आहेत, त्यामुळे गुजरातच्या जनतेने नरेंद्र मोदींची उणीव जाणवून घेऊ नये, असे भावनिक आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे केले.

आगामी गुजरामधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरात दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शहा यांनी अहमदाबाद येथिल टाऊन हॉलमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सीगद्वारे विविध १०० ठिकाणांच्या एक लाख तरुणांसोबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. ‘अधिखम गुजरात’ नावाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शहा म्हणाले, आज मी एक राजकीय व्यक्ती नाही, तर प्राध्यापकाच्या भुमिकेत आहे. तरुणांकडून आलेल्या तब्बल साडेतीन लाख प्रश्नांवर उत्तर देण्याचे काम करीत आहे. या प्रश्नांमधून भाजपबद्दल लोकांच्या खूप अपेक्षा आणि आशा असल्याचे त्यांनी सांगितले.

दीनदयाळ हॉलमधील या कार्यक्रमात एका तरुणाने शहा यांना प्रश्न विचारला की, नरेंद्र मोदी राज्याच्या राजकारणातून बाहेर असल्याने आम्हाला राजकीय दृष्ट्या त्यांची उणीव जाणवत आहे. याबाबत पक्षाने काय विचार केला आहे?

यावर उत्तर देताना शहा म्हणाले की, मोदी पंतप्रधानपदी बसून गुजरातच्या विकासाची सुत्रे चालवित आहेत. पुढील १० दिवसांत नर्मदा नदीवरील धरणाची उंची वाढवण्याबाबत परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. आपण देशभर भाजपच्या प्रचारासाठी फिरलो यावेळी लोकांच्या मनात आणि ह्रदयात मोदींचे अढळ स्थान असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

आणखी एका तरुणाने शहा यांना प्रश्न विचारला की, मोदी सरकारने भ्रष्टाचार संपवण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. मात्र, नोकरशाहीतील छोट्या प्रमाणावरील भ्रष्टाचाराला त्यांना आळा घालता आलेला नाही. यावर उत्तर देताना शहा म्हणाले, आम्ही भ्रष्टाचार संपवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. यासाठी थेट हस्तांतर लाभ योजनेद्वारे गरिबांच्या खात्यात अनुदानाचा पैसा थेट जमा केला. ही रक्कम सुमारे ५९ हजार कोटी रुपये आहे. यामध्ये इतक्याच रकमेचा भ्रष्टाचार थांबवल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, शहा यांनी गुजरातमधील तरुणांना ट्विटर, फेसबूक आणि काही मोबाईल क्रमांकाच्या माध्यमांतून त्यांच्या मनातील प्रश्न भाजपकडे पाठवण्याचे आवाहन केले.