पाटीदार आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या १९ दिवसांपासून उपोषणाला बसलेले पाटीदार समाजातील युवा नेते हार्दिक पटेल यांनी अखेर उपोषण सोडले.

हार्दिक पटेल हे २५ ऑगस्टपासून अहमदाबादमधील निवासस्थानाजवळच उपोषणाला बसले होते. पाटीदार समाजाला आरक्षण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी या त्यांच्या दोन प्रमुख मागण्या होत्या. उपोषणादरम्यान देशभरातील दिग्गज नेत्यांनी त्यांची भेट घेतली. यात शत्रुघ्न सिन्हा, प्रकाश आंबेडकर, यशवंत सिन्हा, जिग्नेश मेवाणी आदी नेत्यांचा समावेश होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील हार्दिक पटेल यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते.

दुसरीकडे गुजरात सरकारने उपोषणाला बसलेल्या हार्दिक पटेल यांच्याशी चर्चा न करण्याची भूमिका घेतली. विश्व उनिया फाऊंडेशनचे सी के पटेल यांनी भाजपा सरकार आणि हार्दिक पटेल यांच्यात चर्चा व्हावी, यासाठी पुढाकार घेतला. मात्र, पाटीदार समाज आरक्षण समितीने यास नकार दिला.

उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यानंतर घरात बसूनच उपोषण करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. अखेर बुधवारी १९ दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. कोणत्याही तोडग्याविनाच त्यांना उपोषण मागे घ्यावे लागले.