गुजरातच्या पोलिसांच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एक महिला पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक झाली आहे. गीता जोहरी या आता गुजरात पोलिसांच्या महासंचालक होणार आहेत. याआधीचेच पोलीस महासंचालक पी पी पांडे या पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या जागी गीता जोहरी यांची नेमणूक झाली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या याचिकेमुळे पांडे यांना या पदावरून दूर व्हावं लागलं होतं. इशरत जहाँ एन्काउंटर केसमध्ये पांडे हे आरोपी आहेत.
गीता जोहरी या १९८२ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या सध्या गुजरातच्या सध्या त्या गुजरात हाऊसिंग काॅर्पोरेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.
इशरत जहाँ एन्काउंटरच्या केसमध्ये पी पी पांडे आरोपी आहेत. २००४ साली झालेलं हे एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप आहे. तर तत्कालीन पोलीस प्रशासनाने याचा इन्कार करत इशरत दहशतवादी असल्याचं म्हटलं होतं. ही केस सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या केसमध्ये आरोपी असणारे पी. पी. पांडे यांच्या जागी गीता जोहरी यांची नेमणूक गुजरातच्या पोलिस महासंचालकपदी करण्यात आली आहे.
पण गीता जोहरी यांच्यावरही अनेक आरोप आहेत. २००५ च्या सोहराबुद्दिन केसमध्ये त्यांनी याआधी बजावलेल्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह आहे. सोहराबुद्दिन केसचा तपास २००६ मध्ये गीता जोहरी यांच्याकडे होता. त्यावेळी त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर वाद उठले होते. सीबीआयने ताशेरे ओढले होते. त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांना त्यांनी काही बेकायदा सूचना दिल्याचं आढळून आलं होतं. शेवटी त्यांनी या केसचा तपास दुसऱ्याला देण्यात यावा यासाठी हायकोर्टात अर्ज केला होता.
गुजरात पोलिसांच्या महासंचालकपदी महिला पोलिसाची नेमणूक झाली ही बाब चांगलीच म्हणायला हवी. पण गीता जोहरी यांचा रेकाॅर्ड पाहता आपल्या कारभाराविषयी चांगलं मत तयार करण्याचं आव्हान त्यांच्या समोर असेल हे मात्र नक्की.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 5:21 pm