कथित आध्यात्मिक गुरू आसाराम यांनी लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारी प्रकरणी जबानी घेण्यासाठी त्यांना येथून सोमवारी अहमदाबाद येथे विमानाने नेण्यात आले. आसाराम आणि त्यांच्या मुलाने असे अत्याचार केल्याची तक्रार सुरत येथील दोन बहिणींनी केली आहे.
अहमदाबाद शहराच्या बाहेर असलेल्या आश्रमात आसाराम यांनी आपल्यावर १९९७ ते २००६ दरम्यान अनेकवेळा लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार मोठय़ा बहिणीने, तर आसाराम यांचा मुलगा साई यानेही २००२ ते २००५ दरम्यान सुरतच्या आश्रमात आपल्यावर असेच अत्याचार केल्याची तक्रार लहान बहिणीने केली आहे.
७२ वर्षीय आसाराम यांना नंतर मुंबईत आणण्यात येणार असून बलात्कार, लैंगिक शोषण तसेच बेकायदेशीर व्यवहारांप्रकरणी त्यांची मुंबईत चौकशी करण्यात येईल. आसाराम यांना अहमदाबादला नेण्याची परवानगी जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी शुक्रवारीच तेथील पोलिसांना दिली होती, परंतु त्यांना अहमदाबादला नेताना त्यांच्या समर्थकांकडून गडबड होण्याच्या शक्यतेने पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा केली. त्यानंतर अहमदाबादचे पोलीस उपायुक्त मनोज निनाम यांनी आपल्या अतिरिक्त फौजफाटय़ासह येथे येऊन आसाराम यांना नेण्याचा निर्णय रविवारी घेतला. आसाराम यांना अहमदाबादला नेण्यासाठी ठरवून विलंब करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आसाराम यांच्याविरोधात नव्याने घडलेल्या तक्रारीचे प्रकरण १० वर्षांपूर्वीचे असून त्याप्रकरणी ठोस पुरावे गोळा करण्यात पोलीस गर्क होते. हे अतिशय आव्हानात्मक काम असून आसाराम यांना कोठडीत डांबून ठेवण्यासाठी पोलिसांना अत्यंत ठोस पुरावा हवा होता.