गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरुवात झाली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांचे भवितव्य पणाला लागले आहे. उर्वरित दोन जागांसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी रिंगणात असून या दोघांचाही विजय निश्चित मानला जात आहे.काँग्रसेमध्ये फूट असल्याचे समोर येत असून दोन आमदारांनी भाजपला मते दिल्याचे समजते.

गुजरातमधील राज्यसभेची निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. अमित शहा, स्मृती इराणी आणि काँग्रेसचे अहमद पटेल हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. पण भाजपने पटेल यांच्याविरोधात बलवंतसिंह राजपूत यांना मैदानात उतरवत या निवडणुकीत रंग भरला. विशेष म्हणजे राजपूत हे काँग्रेसमधूनच भाजपमध्ये सामील झाले होते. अहमद पटेल यांच्या पराभवासाठी भाजपने चंग बांधला आहे. काँग्रेस आमदारांची फोडाफोडी करुन राजपूत यांना राज्यसभेवर निवडून आणायचे आणि पटेल यांचा पराभव करुन काँग्रेसची नाचक्की करायची असे मनसुबे भाजपने रचले आहेत.

अहमद पटेल यांना विजयासाठी ४५ मतांची आवश्यकता आहे. काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ ५७ वरुन ५१ वर आले आहे. फोडाफोडीची धास्ती घेत काँग्रेसने ४४ आमदारांना बेंगळुरुमधील रिसोर्टमध्ये ‘बंदिस्त’ ठेवले. सोमवारी सकाळी हे सर्व आमदार गुजरातमध्ये परतले. काँग्रेसला आणखी एका मताची गरज असून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा जाहीर केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा हादरा बसला असून गुजरात परिवर्तन पार्टी आणि संयुक्त जनता दलाच्या आमदारावर काँग्रेसची भिस्त आहे. भाजपचे गुजरातमध्ये १२१ आमदार असून तिसरा उमेदवार म्हणजेच राजपूत निवडून येण्यासाठी त्यांना आणखी १४ मतांची गरज आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी विजय आमचाच असा विश्वास व्यक्त केल्याने निवडणुकीच्या निकालाकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

मंगळवारी मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्तात काँग्रेसचे ४४ आमदार गांधीनगरला रवाना झाले. गांधीनगरला रवाना होण्यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांनी आमदारांची भेट घेतली. सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून काँग्रेसला रामराम करणारे शंकरसिंह वाघेला हेदेखील विधीमंडळात दाखल झाले आहेत.

LIVE UPDATES:

०२:१७: आम्हाला विजयासाठी आवश्यक मते मिळाली: अहमद पटेल

०२: १६: संध्याकाळी पाचनंतर मतमोजणीला सुरुवात होणार

०२:१५: सूत्रांनी दिलेल्या माहिती अहमद पटेल यांना ४५ मते मिळाल्याची माहिती. काँग्रेसचे ४३ आमदार+ राष्ट्रवादी काँग्रेस १+ जदयू १ = ४५

०२:१३: गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपले.

१२:३१: आत्तापर्यंत आम्हाला ४३ मते मिळाली आहेत, संयुक्त जनता दलाच्या आमदारानेही काँग्रेसला मतदान केल्याचे स्पष्ट केले: काँग्रेसचा दावा

१२:२५: काँग्रेसच्या सर्व आमदारांचे मतदान केले

१०:५८: राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर संभ्रम कायम, यूपीएच्या अहमद पटेल यांना मत दिल्याचा एका आमदाराचा दावा

१०:५०: काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपला मत दिल्याचे वृत्त.

१०:४६: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही आमदारांनी भाजपला मत दिले: गुजरातचे मुख्यमंत्री

०९:४३: राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय होती हे संध्याकाळी स्पष्ट होईलच: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कंधल जडेजा

०९:४२: काँग्रेस उमेदवार अहमद पटेल जिंकणार नाही हे माहित आहे, मग त्यांना मतदान करुन उपयोग नाही. मी पटेलांना मत दिले नाही: शंकरसिंह वाघेला

०९:०९: भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजय निश्चित: गुजरातचे मुख्यमंत्री

०९:०५: गुजरात विधानसभेत मतदानाला सुरुवात

०९:००: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी गुजरात विधानसभेत पोहोचले.

८:१५: काँग्रेस आमदार गांधीनगरच्या दिशेने रवाना