ऐन वेळचा पक्षादेश झुगारून एका आमदाराचा भाजपला पाठिंबा; तर दुसरा आमदार अहमद पटेलांबरोबर

काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत खेळलेल्या लपवाछपवीच्या खेळाची अंतिम परिणती फाटाफुटीमध्ये झाली. ऐन वेळी घाईघाईने बजावलेला पक्षादेश झुगारून खंदाल जडेजा या आमदाराने भाजपच्या बलवंतसिंह रजपूत यांना मतदान केले, तर दुसरे आमदार जयंत पटेल यांनी मात्र ‘पक्षशिस्त’ पाळली.

अहमद पटेल यांच्याविरुद्ध काँग्रेस आमदारांचे बंड आणि त्यामुळे निवडणुकीचा खेळ अवघ्या काही मतांचा असल्याचे स्पष्ट होताच गुजरात विधानसभेमधील राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना निर्णायक महत्त्व आले होते. खरे तर राष्ट्रवादी हा काँग्रेसचा मित्रपक्ष. दोघेही संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) सरकारमध्ये मांडीला मांडी लावून होते. पण अशा संकटाच्या प्रसंगी अहमद पटेलांना स्पष्ट पाठिंबा अगोदरच जाहीर करण्याऐवजी राष्ट्रवादीचे शक्तिशाली सरचिटणीस आणि गुजरातमध्ये स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करणारे प्रफुल्ल पटेल यांनी गूढ निर्माण केले. आम्ही सरकारमध्ये होतो. पण आता फारशी मैत्री राहिली नसल्याचे सांगत त्यांनी रविवारनंतर निर्णय घेणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर आमदार खंदाल जडेजांनी तर भाजपला मतदान करण्याचे आदेश प्रफुल्ल पटेलांनी दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर माध्यमांतून राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल उलटसुलट बातम्या येऊ लागल्या. त्याची पक्षामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू

लागली. सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेंनी तर राष्ट्रवादीचा पाठिंबा काँग्रेसला असल्याचा ‘अंदाज’ व्यक्त केला. यामुळे तर संभ्रमात आणखीनच भर पडली.

शेवटी निवडणुकीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी भूमिकेबाबतचा संशय दूर करण्यासाठी तांत्रिकदृष्टय़ा अहमद पटेलांना मतदान करण्याचा पक्षादेश दोन आमदारांना बजावण्यात आला.

तोपर्यंत मौन बाळगलेल्या शरद पवारांनीही अहमद पटेलांना मतदान करणार असल्याचे मंगळवारी सकाळी स्पष्ट केले. पण तोपर्यंत झालेला उशीर आणि अंतस्थ गोटातील बऱ्याच घडामोडींनी जडेजा आणि पटेल या दोन आमदारांनी वेगवेगळ्या पक्षांना मते दिली. जडेजांचे मत भाजपच्या रजपूतांना गेले, तर जयंत पटेल हे अहमद पटेलांच्या बाजूने उभे राहिले. प्रफुल्ल पटेलांच्या आदेशानुसारच आपण भाजपला मतदान केल्याचे आमदार जडेजा शेवटपर्यंत सांगत होते.

जेडीयू आमदारावरून संशयाचे धुके.. 

जसा राष्ट्रवादीबद्दल शेवटपर्यंत संशयाचे धुके होते, तसाच काहीसा प्रकार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) एका आमदाराबद्दल राहिला. नितीशकुमारांनी त्या आमदारास भाजपला मतदान करण्याचा आदेश दिल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी दिल्लीत दिली, पण खुद्द आमदार छोटू वसावा यांनी आपण अहमद पटेलांनाच मत दिल्याचे निक्षून सांगितले. ‘त्यागी कोण? त्यांचा काय संबंध?’ असा प्रतिसवाल जेडीयूचे गुजरात सरचिटणीस अंबालाल जाधव यांनी केला.