राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना ४० मतंही मिळणार नाही, पटेल यांचा पराभव अटळ असल्याने मी त्यांना मत दिले नाही असे सांगत शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला हादरा दिला. या निवडणुकीचे परिणाम देशभरात उमटतील असेही त्यांनी म्हटले आहे.

गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज (मंगळवारी) मतदान होत आहे. पहिल्या दोन जागांसाठी भाजपकडून अमित शहा, स्मृती इराणी रिंगणात आहेत. या दोघांचा विजय निश्चित आहे. तर तिसऱ्या जागेसाठी सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल आणि भाजपचे बलवंतसिंह राजपूत यांच्यात लढत आहे. या निवडणुकीत शंकरसिंह वाघेला हे किंगमेकर ठरणार आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेतृत्वार प्रश्न उपस्थित केले होते. राज्यसभा निवडणुकीत वाघेला आणि त्यांचे समर्थक आमदार कोणाच्या बाजूने मतदान करणार याविषयी उत्सुकता होती.

मंगळवारी विधीमंडळात मतदान केल्यानंतर शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला मत दिले नाही असे जाहीर केले. ‘काँग्रेसचा पराभव होणार हे आधीपासूनच स्पष्ट होते. मग त्यांना मत देऊन उपयोग काय?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. निवडणुकीच्या आधीच मी काँग्रेस नेतृत्वाला याची कल्पना दिली होती. पण त्यांनी माझे म्हणणे ऐकूनच घेतले नाही. त्यामुळेच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला’ अशी आठवण त्यांनी करुन दिली. काँग्रेसचा या निवडणुकीतील पराभव अटळ असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार पक्ष सोडत असताना काँग्रेसने दिग्गज नेत्याची प्रतिष्ठापणाला लावायला नको होती असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेसचे ४४ आमदार पटेल यांना मतदान करतील याची खात्री नाही. यात क्रॉस व्होटींगही होऊ शकते असे सूचक विधानही त्यांनी केले. वाघेला यांनी भाजपला मतदान केले की ‘नोटा’चा वापर केला यावर स्पष्टीकरण देणे टाळले.

वाघेला समर्थक आमदार महेंद्रसिंह वाघेला यांनीदेखील कोणाला मत दिले याचे उत्तर देणे टाळले. लोकशाहीत मतदान हे गोपनीय असते असे त्यांनी सांगितले. वाघेला आणि त्यांचे समर्थक आमदार बेंगळुरुत गेले नव्हते.