नरेंद्र मोदींचा जीवन संघर्ष शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या गुजरात शिक्षण विभागाच्या निर्णयाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी विरोध दर्शविला आहे.
माझा जीवनसंघर्ष शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करु नये अशी विनंती नरेंद्र मोदींनी केली आहे. गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा यांना फोन करून नरेंद्र मोदींनी गुजरातच्या शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय योग्य नसल्याचे म्हटले. त्यामुळे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह यांनी निर्णय मागे घेण्याचे ठरविले असल्याचे समजते.
मोदींच्या जीवनसंघर्षाची कथा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची घोषणा भूपेंद्रसिंह चुडासमा यांनी केली होती. याची माहिती मिळताच नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या निर्णयाला विरोध दर्शविला आणि जीवीत व्यक्तींचा जीवनपट शालेय अभ्याक्रमात समावेश करणे चुकीचे आहे. आपल्या देशाला अभूतपूर्व इतिहास लाभला आहे. यात अनेक महापुरुषांचे योगदान आहे त्यामुळे इतिहास घडविणाऱया अशा खऱया महापुरुषांची माहिती विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे. असेही मोदी ट्विटरवरून म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीवनप्रवास एक चहावाला ते पंतप्रधान असा संघर्षमय राहीला आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनसंघर्षाची कथा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याचा विचार गेल्या काही दिवसांपासून काही राज्यांकडून केला जात आहे.