करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने अनेक घरांमध्ये सध्या ‘टाइमपास’साठी मोबाइलवर ‘लूडो’ नावाचा ऑनलाइन गेम सर्रास खेळला जातोय. पण, गुजरातच्या बडोद्यात एका कुटुंबासाठी हा लूडो गेम वादाचं कारण ठरला. पत्नीकडून वारंवार हरल्यानंतर एका दाम्पत्यामध्ये भांडणाला सुरूवात झाली. भांडण इतकं वाढलं की पतीने पत्नीला मारहाण करत तिच्या पाठीचा कणा तोडला, अखेर पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

‘181 अभयम हेल्पलाइन’मध्ये आलेल्या तक्रारीनंतर ही घटना समोर आली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, २४ वर्षीय वेमाली येथे राहणारी एक महिला घरात शिकवणी घेते. तर, तिचा पती एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करतो. लॉकडाउनदरम्यान पतीने सोसायटीमध्ये बाहेर इतरांसोबत वेळ घालवण्याऐवजी घरातच राहावे यासाठी तिने त्याला मोबाइलवर लूडो गेम खेळण्यास मनवले. तो गेम खेळण्यास तयार झाला. पण, त्याच्या पत्नीकडून ३-४ गेममध्ये सलग त्याचा पराभव झाला.

आणखी वाचा- एका लग्नाची गोष्ट! फक्त दोन पाहुणे आणि पाठवणीसाठी चक्क पोलिसांची जिप्सी

सलग तीन-चार गेममध्ये वेळेस पत्नीकडून हरल्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीसोबत वाद घालायला सुरूवात केली. दोघांमधील वाद नंतर इतका शिगेला पोहोचला की, त्याने पत्नीला बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आणखी वाचा- “हो आमच्या बाई लॉकडाउनमध्येही शिकवणी घेतात”, पाच वर्षाच्या मुलाने पोलिसांकडे केली तक्रार अन्…

“उपचारानंतर पत्नीने पतीच्या घरी जाण्यास नकार देत माहेरी जाण्याची तयारी केली होती. पण, दोघांच्या समुपदेशनानंतर पतीने पत्नीची माफी मागितली. त्यामुळे पत्नीने त्याच्यासोबत पुन्हा घरी जाण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर पत्नीला पुन्हा मारहाण न करण्याची ताकीद पतीला देण्यात आली”, अशी माहिती ‘181 अभयम हेल्पलाइन’कडून देण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाउनदरम्यान देशात घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ आल्याचं वृत्त मध्यंतरी आलं होतं. त्यामध्ये या अजून एका घटनेची वाढ झाली आहे.