महागाईचा थेट संबंध पेट्रोल आणि डिझेलशी असतो. त्यामुळे पेट्रोल- डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणल्यास दर कमी होतील आणि महागाईदेखील कमी होईल असे मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मांडले. २०१४ च्या निवडणुकीत झालेला पराभव आमच्यासाठी फायदेशीर ठरला. या पराभवामुळे माझे डोळे उघडले, असेही त्यांनी सांगितले.

गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी सोमवारी संध्याकाळी वडोदरा येथे जनतेशी संवाद साधला. यादरम्यान एका महिलेने राहुल गांधी यांना महागाईच्या समस्येवर तुम्ही कसा तोडगा काढणार असा प्रश्न विचारला. यावर राहुल गांधी म्हणाले, महागाईचा संबंध पेट्रोल- डिझेलच्या दराशी असतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. मात्र याचा फायदा सर्वसामान्यांना मिळालेला नाही. विविध करांमुळे पेट्रोल- डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल- डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणल्यास दर कमी होतील आणि शेवटी त्याचा परिणाम महागाईवरही दिसून येईल असे राहुल गांधींनी सांगितले.

भाजपवरही राहुल गांधी जोरदार टीका केली. मला आमची चूक मान्य आहे, पण भाजप टोकाची भूमिका घेणारा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकार देशातील तरुणांना रोजगार देण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. कारणे देऊन उपयोग नाही. भारतात ५ ते १० वर्षात तुम्ही ३० ते ४० हजार तरुणांना रोजगार दिला नाही, तर सर्वसामान्यांमधील असंतोषाला कोणीही थांबवू शकत नाही. रोजगाराच्या बाबतीत भाजपपेक्षा काँग्रेस सरकारची कामगिरी चांगली होती, असा दावाही त्यांनी केला. भाजपला संपवणार असं मी म्हणणार नाही, पण भाजप दुसऱ्यांना संपवण्याविषयी भाष्य करु शकते, असा टोला त्यांनी लगावला. सध्याच्या व्यवस्था नवीन संशोधनांना वाव देत नाही. तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न कराल तर ५० जण तुम्हाला मागे खेचतील असे त्यांनी नमूद केले. नेत्यांनी ५ ते १० वर्ष पुढचा विचार केला पाहिजे. सक्तीने अंमलबजावणी करुन जनतेच्या डोळ्यात पाणी आणणे हे त्याचे काम नसते, असे सांगत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.