खोटे ऐकून ऐकून ‘विकास’ वेडा झाल्याचे सांगत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. आम्ही तुम्हाला स्वतःची ‘मन की बात’ सांगणार नाही तर तुमची ‘मन की बात’ ऐकून घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी गुजरात दौऱ्याला सुरुवात केली. खेडा जिल्ह्यातील जाहीर सभेत राहुल गांधी यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका केली. गुजरातमध्ये विकासाला काय झाले?, हा विकास वेडा का झाला ?, खोटे ऐकून ऐकून हा ‘विकास’ वेडा झाला, असा चिमटा त्यांनी काढला. नरेंद्र मोदींचं ‘गुजरात मॉडेल’ फेल असून, गुजरातमधील जनतेलाही याची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास अगदी छोट्या छोट्या कामातही आम्ही जनतेचे मत जाणून घेणार, असे आश्वासन त्यांनी दिले.

जाहीर सभेतून टीका करतानाच दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही राहुल गांधींनी भाजपला लक्ष्य केले. तुम्ही ‘चौकीदार’ आहात की ‘भागीदार’ असा प्रश्न त्यांनी विचारला. अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीच्या उलाढालीत वर्षभरात १६०० पटींनी वाढ झाल्याचे समोर आले होते. यावरुन राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला.

राहुल गांधी यांचा हा दुसरा गुजरात दौरा आहे. पहिल्या दौऱ्यात राहुल गांधी यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साह आहे. राहुल गांधी हे गुजरातमध्ये मवाळ हिंदुत्वाचा छोटेखानी नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असून, ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान दुसऱ्या दौऱ्यात राहुल गांधी चार प्रमुख मंदिरांमध्ये जाणार आहेत. शेतकरी, पाटीदार (पटेल) समाज, व्यापारी आणि उद्योजक हे त्यांच्या दौऱ्याचे मुख्य केंद्रबिंदू आहेत. दिवाळीनंतर राहुल गांधींचा गुजरात दौऱ्याचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे.