सुलभाच्या (बदलेलं नाव) लग्नाला चार वर्षे झाली होती. तरीही मूल होत नव्हतं. त्यामुळे मूल होण्यासाठी तिने आणि तिच्या पतीने IVF तंत्राचा वापर करुन मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात या दोघांचीही भेट एका स्पर्म डोनरशी झाली. या तरुणाने स्पर्म डोनेट करण्याची तयारी दर्शवली. ज्यानंतर सुलभा गरोदर राहिली आणि तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. या घटनेनंतर पाच वर्षे बरी गेली. मात्र सुलभाच्या नवऱ्याला दारुचे व्यसन जडले. दारु पिऊन तो दररोज तिला ही मुलं माझी नाहीत हे सांगू लागला. त्यांच्यात रोज खटके उडू लागले. खरंतर पाच वर्षांच्या कालावधीत या महिलेचा स्पर्म डोनरशी कोणताही संबंध आला नव्हता. मात्र तूच आयव्हीएफ तंत्र वापरण्याचं सांगितलं होतं त्यामुळे तुझं आणि त्याचं काहीतरी ठरलं असेल असे आरोप या महिलेचा पती करु लागला. हे वाद विकोपाला गेल्यानंतर सुलभा पतीपासून वेगळी राहू लागली. गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये ही घटना घडली आहे.

सुलभा दोन मुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरकाम करु लागली. त्यातून तिला महिन्याकाठी १५ हजार रुपयेही मिळू लागले. याच दरम्यान स्पर्म डोनेट करणाऱ्या तरुणाशी तिची ओळख झाली. हा तरुण अहमदाबादमध्येच कोचिंग क्लासेस चालवतो. या दोघांमध्ये मैत्री झाली. त्याने सुलभाच्या मुलांचा सांभाळ करण्यास सुरुवात केली. पाच महिन्यांपूर्वी सुलभा त्याच्यापासून पुन्हा गरोदर राहिली. त्यामुळे सुलभाने त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र त्याने लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावला आणि दोन्ही जुळ्या मुलांना सोबत घेऊन वेगळा राहू लागला. तो सुलभाला मुलांना भेटूही देईना. त्यामुळे सुलभाची अवस्था इकडे आड तिकडे विहिर अशी झाली. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

तूर्तास सुलभाला(बदललेले नाव) गुजरा सरकारने सखी वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवलं आहे. आपल्यासोबत घडलेल्या दोन घटनांचा तिला धक्का बसला आहे. वस्त्राल या ठिकाणी राहणाऱ्या तरुणाशी तिने आई वडिलांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. मात्र या दाम्पत्याला चार वर्षे अपत्यप्राप्ती झाली नाही. त्यामुळे तिने आयव्हिएफ तंत्राचा वापर करुन जुळ्या मुलांना जन्म दिला. पाच वर्षे सुरळीत गेल्यावर तिच्या पतीने तिच्यावर संशय घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर पुढचा सगळा प्रकार घडला असे तिने अभ्याम हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यांनाही सांगितले.

आई वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केल्याने सुलभाला माहेरचे दरवाजेही बंद झाले होते. अशात समोर आलेल्या दोन कटू अनुभवांमुळे ती कोसळून गेली आहे असे अभ्याम हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या तिचं या ठिकाणी समुपदेशन करण्यात येतं आहे. ती तिच्या घरातच राहात होती मात्र तिचे काम सुटल्याने तिला आर्थिक चणचण भासू लागली. तसेच जुलै महिन्यापासून तिच्या घरमालकाने भाडे भरण्यासाठी तगादा लावला. ज्यामुळे तिने वैतागून अभ्याम हेल्पलाइनला फोन केला. सध्याच्या घडीला तिला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे असंही अभ्याम हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.