शिक्षकांकडे विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी असते. शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार शिक्षकांकडून मिळतात. पण या परंपरेला छेद देणारी घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
कधी पासून हे सुरु होते?
शाळेतील वर्गशिक्षिकाच विद्यार्थ्यासोबत पळून गेली. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी गांधीनगर जिल्ह्यातील कालोल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मुलाचे वडिल सरकारी नोकरीत असून त्यांनी शिक्षिकेवर फूस लावून मुलाला पळल्याचा आरोप केला आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजल्यापासून शिक्षिका आणि मुलगा बेपत्ता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षिका आणि मुलामध्ये वर्षभरापासून घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. या गोष्टी शाळा प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्यांनी दोघांना समज दिली होती. मुलगा आठव्या इयत्तेत आहे. “त्यांचे नाते कोणीही मान्य करणार नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे शुक्रवारी दोघेही घर सोडून निघून गेले अशी माहिती पोलिसांनी दिली. वर्गशिक्षिका किशोरवयीन मुलासोबत पळून गेल्याची ही दुर्मिळ घटना आहे” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
मुलाचे वडिल काय म्हणाले?
कलम ३६३ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. “मी संध्याकाळी सात वाजता घरी पोहोचलो, त्यावेळी मुलगा घरामध्ये नव्हता. मुलगा चार वाजता घराबाहेर पडल्याचे मला बायकोने सांगितले. आम्ही त्याला सगळया ठिकाणी शोधले पण तो कुठेही सापडला नाही. मी शिक्षिकेच्या घरी गेलो पण दोघेही तिथे नव्हते” असे मुलाच्या वडिलांनी सांगितले. दोघांनीही आपले मोबाइल सोबत नेलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध लागू शकलेला नाही असे कालोल पोलिसांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2020 3:52 pm