मुंबईमध्ये पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील गोखले पूल पडल्यानंतर मुंबईमधील पूलांच्या परिस्थितीबद्दल प्रशासन जागे झाले आहे. मुंबईमधील इतरही काही तडा गेलेले किंवा धोकादायक पूल वाहतूकीसाठी बंद केले आहे. मात्र तिकडे गुजरातमध्ये दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या पूलाकडे स्थानिक तसेच राज्य सरकारने पुर्णपणे दुर्लक्ष केल्याने स्थानिक जीव मुठीत धरून याच पुलावरी मागील दोन महिन्यांपासून ये-जा करत आहेत. गुजरातमधील खेडा येथील नदीवरील पूल दोन महिन्यांपूर्वी पडला. मात्र दोन महिन्यांनतरही हा पूल दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही पावले उचललेली नाहीत. म्हणूनच अगदी मोठ्यांपासून ते लहान मुलांनाही शाळेत जाताना जीवाची बाजी लावावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

खेडा येथील निकाई आणि बिराई या गावांना जोडणारा कालव्यावरील पूल दोन महिन्यांपूर्वी पडल्याने दोन्ही गावातील गावकऱ्यांनी अनेकदा स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे हा पूल दुरूस्त करण्यासाठी अर्ज केले. मात्र त्याचा कोणताही फायदा झाला नाही. आम्ही हा तुटलेला पूल वापरला नाही तर अवघ्या एका किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी आम्हाला दहा किलोमीटरचा प्रवास करुन दुसरीकडून नदीपलीकडे जावे लागत असल्याची माहिती स्थानिकांनी एएनआयशी बोलताना दिली.

तर दुसरीकडे खेडाचे जिल्हाधिकारी आय. के. पटेल यांनी लवकरच या पूलाचे काम केले जाईल असे आश्वासन एएनआयच्या माध्यमातून स्थानिकांना दिले आहे. लवकरात लवकर या पुलाच्या पुर्नबांधणीचे आणि डागडुजीचे काम सुरु केले जाईल. जोरदार पावसामुळे मागील दोन महिन्यापासून या पुलाचे काम रखडले असल्याचेही पटेल यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.