गुजरात राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष गुजरात विधानसभा निवडणूक निकालांकडे लागून राहिले आहे. गुजरातमध्ये गेल्या २२ वर्षांपासून सत्तेत असलेला भाजप यावेळीसुद्धा बाजी मारणार अशी शक्यता असतानाच निवडणुकांचे जे कल समोर आले, त्यात मात्र अनपेक्षित चित्र दिसून आले. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आणि प्राथमिक कल काँग्रेसच्या बाजूने पाहायला मिळाले. काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीचा सामना दिसून आला. त्यासोबतच सोशल मीडियावर गुजरात विधानसभा निवडणूक निकाल आणि काँग्रेसची सुरुवातीला पाहायला मिळालेली आघाडी यासंदर्भातील पोस्ट, विनोद, मीम्स जोरदार व्हायरल होत आहेत.

निकालाचे प्राथमिक कल पाहता, काँग्रेसने ज्याप्रकारे आघाडी घेतलेली, ते पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. त्याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. सुरुवातीला काँग्रेसची आघाडी पाहायला मिळाली आणि त्यानंतर हळूहळू भाजप पुढे येऊ लागला, याचाच अंदाज घेत सोशल मीडियावर जोक्स आणि मीम्स व्हायरल होऊ लागले. काँग्रेसने इतकी आघाडी घेतली की नंतर काँग्रेसला थेट गुजरातबाहेरच जावे लागले, अशा आशयाचे जोक्स पाहायला मिळाले.

एकंदरीत, गुजरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सोशल मीडियावरही उसळली आहे. नरेंद्र मोदी, राहुल गांधी, हार्दिक पटेल यांच्याविषयीच्या चर्चा आणि हॅशटॅग ट्रेंडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.