गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतली. यात नव्या २४ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे रुपाणी मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्यांला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. तसेच मला कुणीही बाहेर काढू शकत नाही, असं म्हणाणाऱ्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग येणार असंच चित्र आहे. विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, अशा चर्चा सुरू होत्या. आघाडीच्या काही नावांमध्ये उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नावाचाही समावेश होता. मात्र, नितीन पटेल आणि इतर नेत्यांपैकी बाजी मारली ती भूपेंद्र पटेल यांनी. मुख्यमंत्रिपद हुकल्यानंतर मंत्रिपद कायम राहिल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात नितीन पटेल यांना स्थान मिळालेलं नाही.

“जोपर्यंत मी माझ्या लोकांच्या, मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हृदयात आहे तोपर्यंत मला कोणीही बाहेर फेकू शकत नाही. मी अस्वस्थ नाही. मी १८ वर्षाचा होतो तेव्हापासून भाजपमध्ये काम करत आहे आणि काम करत राहीन. मला पक्षात पद मिळो अथवा न मिळो मी पक्षात असेपर्यंत सेवा करत राहीन. मला लोक काय म्हणतात याची चिंता नाही. भूपेंद्र भाई आमचेच आहेत. त्यांनी मला आमदार म्हणून त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केले. ते माझे मित्र आहेत. लोक काय बोलतात किंवा काय विचार करतात याची मला पर्वा नाही. तुमच्यामुळे माझ्या अस्तित्वाला धोका नाही,” असं ते उपस्थित जनतेला म्हणाले होते.

गुजरातमध्ये २४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी; रुपाणी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना डच्चू!

गुजरातच्या घाटलोदियातून आमदार असलेले भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल पाटीदार समाजाचे आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने रणनिती आखत पटेल यांच्या खांद्यावर जबाबदारी दिल्याचं बोललं जात आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १८२ पैकी ९९ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने ७७ जागांवर विजय मिळवला आहे.