जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात अजूनही संभ्रमावस्था कायम आहे. शुक्रवारी मध्यरात्री जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर शनिवारी सकाळी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र वेगळाच अनुभव आला. शनिवारी सकाळी गुजरात क्वीनच्या प्रत्येक प्रवाशांकडून एका तिकिट तपासनिसाने (टीटीई) जीएसटीच्या नावाखाली अतिरिक्त २०-२० रूपये वसूल केले. या वेळी प्रवासी आणि टीटीईमध्ये वादही झाला. प्रवाशाकडून परिपत्रकाची व पावतीची मागणी करण्यात येत होती. टीटीईने त्यांना समाधानकारक उत्तर दिले नाही. प्रवासी प्रचंड चिडले होते. यातीलच एका प्रवाशाने पैसे मागतानाचा टीटीईचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, प्रवाशांकडून २०-२० रूपये घेणाऱ्या या टीटीईला कामावरून कमी करण्यात आल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

रेल्वेने पूर्वीच स्पष्ट केले होते की, एक तारखेनतंरच्या एसी श्रेणीतील तिकिटांवर जीएसटी लागू होईल. त्यामुळे पूर्वी ज्यांनी तिकिट काढले असेल त्यांना जीएसटी लागू होणार नव्हता. तरीही गुजरात क्वीनमधील टीटीईने प्रत्येक प्रवाशाकडून २०-२० रूपये घेतले. त्यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष पसरला होता. अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली. परिपत्रक दाखवण्याची मागणी त्यांनी टीटीईकडे केली. पण प्रत्येकाला मला ते परिपत्रक दाखवणे शक्य नसल्याचे त्याने सांगितले. या टीटीईने प्रत्येकाकडून २०-२० रूपये अखेर वसूल केलेच. अनेकांनी याबाबत तक्रारही केली होती.

टीटीईचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली. रविवारी या टीटीईला कामावरून कमी करण्यात आल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट सूचना असतानाही पैसे वसूल करण्यात आल्याने प्रवासी प्रचंड चिडले होते.

दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्यानंतरची सर्वांत मोठी करसुधारणा ठरलेल्या वस्तू व सेवा करप्रणालीच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी शनिवारी देशभरात संभ्रमावस्थेचे चित्र दिसले. सत्ताधाऱ्यांसह काही राजकीय पक्षांनी या करप्रणालीचे स्वागत केले असले तरी काही राज्यांत व्यापारी वर्गाने मात्र निषेधाचा सूर लावला. दुसरीकडे, ग्राहकांनीही हात आखडता घेतल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. जीएसटीवरून सोशल मीडियावर जोक्स पडत आहेत. अनेकजण रेस्तराँची आपली बिले सोशल मीडियावर शेअर करत आहेत.