गुजरातमध्ये २००२ साली झालेली दंगल ही राज्यामधील दुर्दैवी घटना होती, अशी प्रतिक्रिया गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी युरोपीय महासंघाच्या दूतांजवळ व्यक्त केली.
युरोपीय महासंघाने २००२ मधील दंगलींच्या घटनेमुळे नरेंद्र मोदी यांना प्रवेशबंदी केली होती. नुकतीच महासंघाने ही बंदी मागे घेतली. या पाश्र्वभूमीवर, नरेंद्र मोदी यांनी एक महिन्यापूर्वीच जर्मनीच्या दूतावासात युरोपीय महासंघाच्या प्रतिनिधींची तसेच जर्मनीचे राजदूत मायकेल स्टेनर यांची भेट घेतल्याचे पुढे आले आहे.
या ‘माध्यान्ह भोजन’ शिष्टाईत मोदी यांनी उपरोक्त भावना व्यक्त केल्याची माहिती स्टेनर यांनी दिली. ७ जानेवारी रोजी झालेल्या या बैठकीमध्ये मोदी यांनी भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल आदर व्यक्त करतानाच न्यायालयाचा निर्णय आपल्याला बंधनकारक असेल असा स्पष्ट निर्वाळा दिला. तसेच २००२मधील दंगल ही अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. त्याचवेळी भारतीय न्यायपद्धतीवर आपला पूर्ण विश्वास असल्याची भावना स्टेनर यांनी व्यक्त केली.
नरेंद्र मोदी यांना न्यायालयाने नरोडा पटीयाप्रकरणी सर्व आरोपातून मुक्त केल्यामुळे तसेच सलग तिसऱ्या वेळी मोदी मुख्यमंत्रीपदी निवडून आल्याने युरोपीय महासंघ मोदी आणि गुजरात राज्य यांच्याशी व्यापारी संबंध जोडण्यास उत्सुक असल्याची माहितीही स्टेनर यांनी दिली.