गुजरातमध्ये पुढील महिन्यात राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होत आहेत. तसंच या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे. त्याआधीच काँग्रेसला मोठे हादरे बसले आहेत. गुजरातमधील काँग्रेसच्या तीन आमदारांनी गुरुवारी राजीनामे दिले होते. तर आज आणखी दोन आमदारांनी राजीनामे दिले आहेत. बलवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल आणि पी. आय. पटेल यांच्यानंतर छनाभाई चौधरी आणि मानसिंह चौहान यांनीही काँग्रेसला रामराम केला. तर जामनगर ग्रामीणचे आमदार राघव सिंह पटेल यांनीही पुढील निवडणूक काँग्रेसकडून लढणार नसून भाजपनं सांगितलं तर राजीनामा देईन, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. दरम्यान, पाच आमदारांनी आपल्याकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत, अशी माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिली आहे.

पुढील महिन्यात गुजरातमध्ये राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. त्या आधीच काँग्रेसमधील फूट चिंता वाढवणारी आहे. आतापर्यंत पाच आमदारांनी राजीनामे दिले असून ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. आणखी आमदार राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. राजीनामा दिलेल्यांपैकी तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या राजीनाम्यानं अहमद पटेल यांची राज्यसभेवर जाण्याची वाटही बिकट केली आहे. हे सर्व आमदार शंकरसिंह वाघेला यांच्या गटातील होते. वाघेला हे गुजरात काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते होते. त्यांनी गेल्याच आठवड्यात पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या समर्थक आमदारांनीही आता राजीनामे दिल्याने काँग्रेसची चिंता आणखीनच वाढली आहे. बलवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल आणि पी. आय. पटेल यांनी गुरुवारीच राजीनामे दिले होते. विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी राजीनामे सुपूर्द केले होते. काँग्रेस आमदारांचा राजीनामासत्र ही अहमद पटेलांसाठीही चिंताजनक आहे. त्यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना वाघेला गटाचं समर्थन मिळालं नाही तर निवडून येणं अशक्य आहे, असं सांगितलं जातं. दरम्यान, अहमद पटेल यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच वाघेला यांनीही आपण पटेल यांना मतदान करणार असल्याचं जाहीर केलं आहे.