अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीत २००२ साली घडलेल्या जळीतकांडाच्या खटल्यातील दोषींना येत्या शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात येईल. विशेष न्यायालयाने सोमवारी याबाबत माहिती दिली. या खटल्यातील दोन्ही बाजूंचे युक्तिवाद शुक्रवारी पूर्ण झाले होते.
‘गुलबर्ग’ जळीतकांडात २४ जण दोषी
शिक्षेचे प्रमाण ठरवण्याबद्दलचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष तपास पथकाचे (एसआयटी) विशेष न्यायाधीश पी. बी. देसाई यांनी खटल्याची सुनावणी १३ जूनपर्यंत लांबणीवर टाकली होती. आज झालेल्या सुनावणीवेळी शिक्षेची तारीख निश्चित करण्यात आली.
गुलबर्ग सोसायटी जळीतकांड प्रकरण हे ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ या प्रकारातील असल्याने दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जावी आणि अशा प्रकारची कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत असा संदेश शिक्षेच्या प्रमाणातून समाजात जायला हवा, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील आणि एसआयटीचे वकील आर. सी. कोदेकर यांनी केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने २४ आरोपींना दोषी ठरवले आहे.