येथील गुलबर्ग सोसायटी हत्याकांड प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या २४ गुन्हेगारांना १७ जून रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या हत्याकांडात काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह ६९ जण ठार झाले होते. विशेष न्यायाधीश पी.बी. देसाई यांनी सांगितले, की या गुन्हेगारांना १७ जून रोजी शिक्षा सुनावली जाईल. अभियोक्तयांनी या २४ आरोपींनी आतापर्यंत भोगलेल्या तुरुंगवासाचा कालावधी कळवला आहे. २ जून रोजी न्यायालयाने ११ आरोपींना खून व इतर गुन्ह्य़ांसाठी तर विहिंप नेते अतुल वैद्य यांच्यासह १३ जणांना किरकोळ गुन्ह्य़ांसाठी दोषी ठरवले होते. या प्रकरणी इतर ३६ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाने शिक्षेच्या प्रमाणाबाबत गेल्या शुक्रवारी युक्तिवाद पूर्ण ऐकून घेतले. अभियोक्ता व बचाव पक्षाने त्यांची बाजू मांडली. सरकारी वकील व सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष चौकशी पथकाचे वकील आर.सी. कोडेकर यांनी न्यायालयाला सांगितले, की या २४ आरोपींना एकतर फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी. कारण २४ आरोपी कलम १४९ अन्वये दोषी ठरले आहेत. या हत्याकांडातील पीडितांचे वकील एस.एम व्होरा यांनी सांगितले, की आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी. शिक्षा समांतर न देता वेगळी द्यावी म्हणजे त्यांना सर्व जीवन तुरुंगात काढावे लागेल. आरोपींचे वकील अभय भारद्वाज यांनी फाशीच्या शिक्षेची मागणी फेटाळताना सांगितले, की कटाचा आरोप सिद्ध झालेला नाही, ती केवळ प्रतिक्षिप्त क्रिया होती.