ख्यातनाम गीतकार व कवी गुलजार यांनी एक नवीन कवितासंग्रह लिहिला असून तो ‘प्लुटो’ नावाच्या ग्रहाला समर्पित आहे.
‘प्लुटो’ या काव्यसंग्रहात त्यांनी नातेसंबंध, देवाशी नाते, निसर्ग, काळ, कवितेची कला, सांसारिक गोष्टीतही अर्थ शोधण्याची असामान्य क्षमता हे आपल्या आवडीचे विषय असल्याचे म्हटले आहे. या कविता निरूपमा दत्त यांनी इंग्रजीत रूपांतरित केल्या आहेत. ‘हार्पर कॉलिन्स इंडिया’ या कंपनीने हे पुस्तक प्रथमच इंग्रजीत प्रकाशित केले आहे, त्यात गुलजार यांनी काढलेली रेखाचित्रे आहेत.
प्लुटो या ग्रहाने काही वर्षांपूर्वी ग्रहपद गमावले, त्यामुळे आता सूर्यमालेत आठच ग्रह मानले जातात.गुलजार म्हणतात, ‘‘वैज्ञानिक प्लुटोला ग्रह मानायला तयार नाहीत, आमच्या नवग्रही कुटुंबात तुला स्थान नाही, तो तू नाहीस, पण तू एकटा नाहीस. मी सुद्धा माझ्या कुटुंबातील स्थान गमावले  जेव्हा माझ्या कुटुंबाने व्यापारी कुटुंबात मिराशी कसा, असा प्रश्न विचारला होता. तू आमच्यातला नाहीस याच्या स्तब्धतेचे प्रतिबिंब दिसते आहे. प्लुटोला ग्रहपद नाकारले गेले तेव्हा खरोखर दु:ख वाटले, तो छोटासा ग्रह व माझ्या चिमूटभर आकाराच्या कविता त्याला सप्रेम भेट आहेत. काही क्षण हे क्षणभंगुर असतात, आपण त्यांना पकडू शकत नाही, मला ते स्मृतीत साठवावे वाटतात.’’
गुलजार यांच्या मते त्यांच्या या अपारंपरिक कवितासंग्रहात १११ कविता आहेत, पण त्याला अर्थ आहे.
दत्त यांनी सांगितले की, गुलजार हे ‘आर्टिस्ट ऑफ स्मॉल थिंग्ज’ आहेत. छोटे क्षण ते कवितांमध्ये पकडतात, ते इतक्या असोशीने त्यांना गाठतात की, छोटी आश्चर्येही उत्कंठा वाढवतत.