गुलजार यांचा जेएनयूतील विद्यार्थ्यांना पाठिंबा

देशातील युवक जेव्हा विद्रोहाचे आवाज उठवतात तेव्हा मला उलट सुरक्षित वाटते, अशा शब्दांत गीतकार गुलजार यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.

जेएनयू वादाबाबत विचारले असता स्प्रिंग फिव्हर २०१६ कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, देशातील युवक हे मोठे आशास्थान आहे. मी सेंट स्टीफन कॉलेजमध्ये असताना रशियन राज्यक्रांतीवरची पुस्तके वाचत असे व आज क्रांतीचे हुंकार उठत आहेत ते युवकांचे आहेत, जेएनयूतील विद्यार्थ्यांचे आहेत. मला उलट असे युवक बघून बरे वाटते. त्यामुळे देश व मी सुरक्षित आहे असे वाटते.

बंटी और बबली या २००५ मधील चित्रपटाबाबत त्यांनी सांगितले की, त्यातील कजरारे गाणे हे ट्रकच्य मागे जी शेरोशायरी असते त्यावरून प्रेरणा घेऊन लिहिले होते, त्यातील ओळी या ट्रकच्या मागे जे लिहिलेले असते तशाच स्वरूपाच्या आहेत. ते मी लिहिलेले पहिले आयटम साँग होते. गुलजार यांनी दिलसेमधील छय्या छय्या हे गाणेही लिहिले होते त्याबाबत ते म्हणाले की, दिल्लीत असताना गुरुद्वारात बुलेह शहा यांचे काव्य मी ऐकले होते, त्यातून हे गाणे सुचले. सुरुवातीला चित्रपट गीते लिहू नये असे वाटत होते. वाचक व लेखक एवढय़ाच भूमिकेत रहावे असे वाटत होते.