बंदुकीच्या जोरावर होणाऱ्या हिंसाचाराच्या वाढत्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी काही र्निबध प्रस्तावित केले असतानाच एका सात वर्षांच्या विद्यार्थ्यांने शाळेच्या दप्तरातूनच बंदूक आणल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याचे न्यूयॉर्क पोलिसांनी सांगितले.
सदर बंदूक .२२ प्रतीची होती आणि त्यामुळे क्वीन्स या शेजारच्या शहरात असलेल्या मार्गावरील वेव्ह प्रेपरेटरी एलिमेण्टरी शाळेला जवळपास एक तास टाळे ठोकण्याची वेळ पोलिसांवर आली. बंदूक आणणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव समजू शकलेले नाही. त्याचप्रमाणे या बंदुकीमध्ये गोळ्या भरलेल्या होत्या का, तेही कळू शकले नाही. त्याबाबत तपास सुरू आहे.
कनेक्टिकटमधील शाळेत झालेल्या अंदाधुंद गोळीबारत २० जण ठार झाले होते. त्यानंतर गुरुवारीच ओबामा यांनी काही र्निबध प्रस्तावित केले. त्यावरून चर्चा सुरू असतानाच विद्यार्थ्यांच्या दप्तरातच बंदूक सापडल्याने खळबळ माजली आहे.