14 August 2020

News Flash

पिकाची नासाडी करु नका….पण त्यांनी ऐकलं नाही ! मध्य प्रदेशातील शेतकऱ्याने मांडली आपली व्यथा

आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकरी दाम्पत्यावर रुग्णालयात उपचार सुरु

माझ्याजवळ कोणताही पर्याय उरला नव्हता. पिकाची नासाडी करु नका म्हणून मी त्यांच्या पाया पडलो पण त्यांनी माझं ऐकलं नाही. याआधीही त्यांनी असंच केलं होतं आणि माझं कर्ज वाढलं. त्या प्रकारानंतर माझ्या सहा मुलांना जेवायला देण्यासाठी माझ्याकडे काहीही उरलेलं नाही याची मला जाणीव झाली”, मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील रुग्णालयात राजकुमार अहिरवार हा शेतकरी आपली व्यथा सांगत होता. १४ जुलै रोजी राजकुमार आणि त्याच्या पत्नीने डोळ्यासमोर आपल्या शेतातल्या पिकाची नासाडी होत असल्याचं पाहून विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरात याविरोधात संतापाची लाट उसळली होती.

आणखी वाचा- “आत्महत्येशिवाय पर्याय नाही”, पोलिसांनी पिकावर बुल्डोजर चालवल्याने शेतकरी दांपत्याने केलं विष प्राशन

पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजकुमारच्या सोयाबीन पिकाची नासाडी केली. विष प्राशन केल्यानंतर राजकुमार आणि त्याच्या पत्नीला पोलीस त्याच परिस्थितीत व्हॅनमध्ये नेत असताना शिशुपाल या राजकुमारच्या भावाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पोलिसांनी उपस्थित जमावावर लाठीमार केला. प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने तात्काळ दखल घेत ६ पोलिसांचं निलंबन केलं. याव्यतिरीक्त जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांचीही बदली करण्यात आली. आपल्या आई-वडिलांच्या शेजारी बसून रडणाऱ्या मुलांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षासह सर्वांनी सरकारला धारेवर धरलं होतं.

आणखी वाचा- गरीबांवर, दलितांवर, शेतकऱ्यांवर हल्ला हाच भाजपाचा खरा चेहरा- प्रियंका गांधी

राजकुमारचा भाऊ शिशुपालने पोलिसांवर हल्ला केला म्हणून प्रत्युत्तरादाखल पोलिसांना लाठीमार करावा लागला अशी माहिती पोलिस विभागाने दिली. परंतू शिशुपालने हा आरोप फेटाळला आहे. “मी कोणत्याही पोलिसावर हल्ला केला नाही. विष प्राशन केल्यानंतर ते माझ्या भावाला आहे त्या परिस्थितीत घेऊन जात होते म्हणून मी एका कॉन्स्टेबलला धक्का दिला. मी त्यांना माझ्या भावाला व्यवस्थित घेऊन जा असं सांगत होतो. त्यांनी आम्हाला केवळ मारलं नाही तर जातिवाचक शिवीगाळही केली ज्यामुळे मला राग आला.” पोलिसांनी केलेल्या मारहाणीत शिशुपालच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

आणखी वाचा- “आता लाजही वाटत नाही”; तो व्हिडीओ पाहून अभिनेत्याची पोलिसांवर टीका

ती जमीन आमच्या मालकिची आहे आणि आम्ही ती सोडणार नाही असं आम्ही अजिबात बोललो नाही. पिक तयार होईपर्यंत दोन महिने थांबा असं आम्ही पोलिसांना सांगत होतो. पण त्यांनी जराही ऐकून न घेता पिकाची नासाडी केली, राजकुमारच्या परिवारातील एका सदस्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना माहिती दिली. अहिरवार शेती करत असलेल्या जमिनीचा खटला गेली काही वर्ष सुरु होता. पिक तयार होईपर्यंत प्रशासन थांबू शकत नव्हतं का याबद्दल इंडियन एक्सप्रेसने ग्वालियारच्या विभागीय आयुक्तांकडून माहिती घेतली.

आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिरवार शेती करत असलेली जमीन ही सरकारी आहे आणि त्या जागेवर कॉलेजचं बांधकाम होणं अपेक्षित आहे असं सरकारचं म्हणणं आहे. जिल्हा न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यानंतर ही बाब सिद्ध होणारच होती. मात्र जमीन वेळेत ताब्यात घेतली नाही, तर सरकारी कॉलेजचा प्रकल्प हा दुसऱ्या जिल्ह्यात जाईल असं माजी जिल्हाधिकारी एस. विश्वनाथन यांचं म्हणणं होतं. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्यावर कारवाईचा आदेश दिला असून उच्चस्तरीय चौकशीचाही आदेश आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवर टीका करताना राज्यात ‘जंगल राज’ असल्याचं म्हटलं आहे. कमलनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “दलित दांपत्याला पोलिसांकडून निर्घृणपणे मारहाण करण्यात आली. हे कोणत्या प्रकारचं जंगल राज आहे ? जर हा सरकारी जमिनीचा मुद्दा होता तर तो कायदेशीर मार्गाने सोडवता आला असता. पण पती, पत्नी आणि मुलांना मारहाण करणं हे योग्य नाही. जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 2:10 pm

Web Title: guna police assault i begged them not to destroy the crop nothing to feed my kids psd 91
Next Stories
1 अंडरवेअरवरुन भांडण, तक्रार नोंदवायला पोहोचला पोलीस ठाण्यात
2 यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवासेना सर्वोच्च न्यायालयात; दाखल केली याचिका
3 मागच्या दीड वर्षापासून आम्ही बोलत नव्हतो, पण पायलट परत आले तर त्यांना मिठी मारेन – अशोक गेहलोत
Just Now!
X