मुंबई पोलीस आणि मुंबईविषयी केलेल्या विधानांमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत गुंडाराज चालू असल्याचा आरोप करत कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असा उल्लेख करत टीका केली आहे. साहिल चौधरीला अटक केल्यानंतर कंगनानं ट्विट केलं असून, काँग्रेसला सवाल केला आहे.

हरयाणातील यू-ट्यूबर साहित चौधरी यानं महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. या प्रकरणात साहिल चौधरीला अटक करण्यात आल्यानंतर कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “मुंबईत हे काय गुंडाराज सुरू आहे. जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यंत्र्यांना व त्यांच्या टीमला कुणीही प्रश्न विचार नाहीये. त्यांनी आमच्यासाठी काय केलं? आमचं घर तोडलं आणि आम्हाला मारलं? याला उत्तरदायी कोण आहे, असा प्रश्न कंगनानं काँग्रेसला विचारला आहे.

आणखी वाचा- “ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग”; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया

“साहिलनं महाराष्ट्र सरकारला त्यांच्या कामावरून प्रश्न विचारले म्हणून कुणीतरी त्यांच्याविरोधात अचानक गुन्हा दाखल केला, जो की त्याचा लोकशाही अधिकार आहे. त्यानंतर साहिलला तात्काळ तुरूंगात टाकण्यात आलं. पण, पायल घोषनं अनुराग कश्यपविरोधात अनेक दिवसांपूर्वी बलात्तकाराचा गुन्हा दाखल केला आहे. पण, तो मुक्तपणे फिरतोय. हे सगळं काय आहे,” असा सवाल कंगनानं काँग्रेसला केला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सातत्यानं बॉलिवूडमधील काही कलाकारांवर टीका करणाऱ्या कंगना रणौतनं मुंबई पोलिसांवर टीका केली होती. त्याचबरोबर मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. विशेष म्हणजे तिने नंतर मुंबईची तुलना पीओकेशी नाही, तर सीरियाशी करायला हवी होती, असं विधान केलं होतं. याप्रकरणात कंगना सातत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे.