गस्तीवर असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची अत्यंत जवळून गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. मारेकऱ्याने पोलिसांना गोळ्या घातल्यानंतर स्वत:वरही त्याच पिस्तुलातून गोळ्या झाडून आत्महत्या केली, अशी माहिती न्यूयॉर्क पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. काही महिन्यांपूर्वी पोलिसांकडून नि:शस्त्र कृष्णवर्णीय व्यक्तींची हत्या झाली होती. या हत्येचे पडसाद देशभरात उमटले होते आणि कित्येक आठवडे या हत्येच्या विरोधात देशव्यापी निषेध सुरू होता, या पाश्र्वभूमीवर पोलिसांच्या हत्येचे हे प्रकरण पुढे आले आहे.
गेली सात वर्षे न्यूयॉर्क पोलीस खात्यात काम करणारे वेनजिन लिऊ आणि दोन वर्षांपूर्वी खात्यात रुजू झालेले राफेल रामोस अशी हत्या करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. येथून ३०० किलोमीटर अंतरावर असेलल्या बाल्टिमोर या शहारतून पोलिसांच्या गस्ती वाहनाचा पाठलाग करण्यात आला. इस्माइल ब्रिन्सले असे या मारेकऱ्याचे नाव असून तो २८ वर्षीय कृष्णवर्णीय तरुण आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून काही महिन्यांपूर्वी एरिक गार्नर आणि मायकेल ब्राऊन या दोघा नि:शस्त्र कृष्णवर्णीय व्यक्ती ठार झाल्या होत्या, त्याचा सूड म्हणून आपण हे कृत्य करीत असल्याचे ब्रिन्सले याने सामाजिक माध्यमांवर नमूद केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असली तरीही प्रथमदर्शी ही हत्या असून अत्यंत थंड डोक्याने ती करण्यात आली, असा दावा न्यूयॉर्कचे महापौर बिल डे ब्लासिओ यांनी केला. रामोस आणि लिऊ हे न्यूयॉर्क पोलीस दलातील अत्यंत प्रभावी अधिकारी होते, कोणतीही चिथावणी नसताना त्यांना अमानुषपणे मारण्यात आले. आपल्या बंद गस्तीवाहनातून जात असताना ब्रूकलीन येथे त्यांचे ‘अँबुश’ करण्यात आले, अशा शब्दांत न्यूयॉर्कचे पोलीस आयुक्त विल्यम ब्रॅट्टन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

असा हल्ला झाला..
ब्रिन्सले याने पोलिसांच्या गस्तीवाहनाचा तब्बल ३०० किलोमीटर पाठलाग केला. ब्रूकलीन येथे त्याने पोलिसांच्या वाहनाजवळ येऊन त्यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला. गस्तीवाहनास असलेल्या खिडक्यांमधून ब्रिन्सले याने पोलिसांच्या डोक्यात आणि शरीराच्या वरच्या भागात गोळ्या मारल्या. या गोळ्यांचे आगात इतके वर्मी होते की शरीराची काही हालचाल करण्यापूर्वीच दोन्ही पोलीस अधिकारी ठार झाले. या हत्याकांडानंतर ब्रिन्सले जवळच असलेल्या एका भुयारी स्थानकात शिरला आणि त्याने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. घटनेच्या आदल्या दिवशी सकाळी ब्रिन्सले याने आपल्या पूर्वीच्या प्रेयसीवरही गोळीबार करून तिला गंभीररीत्या जखमी केले होते.

त्यांनी आमचा एक मारला तर आम्ही दोन मारू..
ब्रिन्सलेने आपल्या माजी प्रेयसीच्या ‘इन्स्टाग्राम’ अकाउंटवरून पोलिसांविरोधातील प्रक्षोभक संदेश प्रसिद्ध dv10केले होते, अशी माहिती न्यूयॉर्क पोलीस आयुक्त ब्रॅट्टन यांनी दिली. ‘आज मी त्या डुकरांवर हल्ला करणार आहे. त्यांनी आमचा एक मारला तर आम्ही त्यांचे दोन जण टिपू’, अशा शब्दांत त्याने संदेश प्रसिद्ध केले होते. तसेच त्या हत्येनंतर, ‘पोलिसांना मारले, एरिक गार्डनर आणि माइक ब्राऊन यांच्या मृत आत्म्यास शांती मिळो. हा माझा शेवटचाच संदेश’, असेही ब्रिन्सले याने म्हटले होते.
dv11*ब्रूकलीन येथील चौकात लिऊ आणि रामोस या दोघा निष्पाप पोलीस अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला.