अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठाच्या आवारात एका बंदूकधाऱ्याने बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात तीन जण जखमी झाले, तर या बंदूकधाऱ्याला ठार करण्यात पोलिसांना यश मिळाले.
अमेरिकेमध्ये सध्या बेछूट गोळीबार होण्याच्या घटना वाढत आहेत. फ्लोरिडा विद्यापीठातील मुख्य ग्रंथालयाच्या बाहेर बुधवारी मध्यरात्री एका तरुणाने गोळीबार केला. विद्यापीठ पोलिसांनी त्याला बंदूक फेकून शरण येण्याचे आवाहन केले. मात्र त्याने त्यास नकार दिला आणि गोळीबार सुरूच ठेवला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ठार केले. या गोळीबारात जखमी झालेल्या तीनही विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबाराचे नेमके कारण काय याची चौकशी सुरू आहे. विद्यापीठातील हे ग्रंथालय २४ तास चालू असते. बंदूकधारी व्यक्ती ग्रंथालयातूनच बाहेर आली होती. त्यामुळे ग्रंथालय कर्मचारी आणि काही विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. याआधीही अमेरिकेत माथेफिरूंनी विद्यार्थ्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी गोळीबार केल्याच्या काही घटना घडल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.