अफगाणिस्तानमधील काबूल शहर मंगळवारी रात्री गोळीबाराच्या आवाजाने  हादरले. काबूलमधील शिया पंथीयांच्या धार्मिक स्थळावर तीन सशस्त्र बंदुकधा-यांनी  हल्ला केला. या हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला असून २६ जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
काबूलमध्ये शिया पंथीयांच्या धार्मिक स्थळी शेकडो जण जमले होते. याच दरम्यान सैन्याच्या गणवेशात आलेल्या ३ बंदुकधा-यांनी धार्मिक स्थळावर हल्ला केला. त्यांनी अनेकांना बंधक बनवल्याने सुरक्षा यंत्रणांसमोरील आव्हान वाढले होते. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. तासाभराच्या चकमकीनंतर तिघांचाही खात्मा करण्यात यश आले आहे.

अफगाणिस्तानमधील गृहमंत्रालयाचे प्रवक्ते सादिक सिद्दीकी यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका पोलिसाचा समावेश आहे. इस्लाम धर्माचे प्रेषित मोहंमद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांचा बुधवारी स्मृतीदिवस आहे. यानिमित्त शिया पंथातील मुस्लिम मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळावर जमले होते. या पार्श्वभूमीवर हा हल्ला केला असून या हल्ल्यात २६ हून अधिकजण जखमी झाले आहेत. हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अफगाणिस्तानमध्ये शिया पंथीयांच्या धार्मिक स्थळावर हल्ला होण्याची ही दुसरी घटना आहे. जुलैमध्ये झालेल्या हल्ल्यात ८० जणांचा मृत्यू झाला होता. मोहरमच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिया पंथीयांच्या धार्मिक स्थळांवर हल्ला होऊ शकतो असा इशाराही अफगाणमधील गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा यंत्रणांना दिला होता.