पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात हल्लेखोरांनी १४ जणांची हत्या केली. बंदुकधाऱ्यांनी नागरिकांना बसमधून उतरवून त्यांच्यावर गोळया झाडल्या. दक्षिणपश्चिमेकडील अशांत असलेल्या भागातील फुटीरतावाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. निमलष्करी दलाचा युनिफॉर्म घातलेले २० पेक्षा जास्त हल्लेखोर होते अशी माहिती बलुचिस्तानचे गृह सचिव हैदर अली यांनी दिली.

माकरान कोस्टल हायवेवर त्यांनी बस अडवून लोकांना खाली उतरवले व १४ नागरिकांची हत्या केली. ओरमाराहून कराचीच्या दिशेने ही बस चालली होती. बलूच नसलेल्या प्रवाशांना निवडून त्यांची हत्या करण्यात आली आहे. ओळखपत्रावरुन कोण पाकिस्तानी, कोण बलूच याची ओळख पटवून नंतर हत्या करण्यात आली.

पाकिस्तानी नौदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांचा मृतांमध्ये समावेश आहे. आम्ही सर्वसामान्य प्रवाशांची हत्या केली नाही. फक्त नौदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य केले असे हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संघटनेच्या सदस्याने सांगितले.