श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील राजकीय प्रक्रियेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीत बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला हजर राहण्याचा निर्णय गुपकर आघाडीने घेतला आहे. या आघाडीचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी ही माहिती दिली.

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रित केल्यानंतर डॉ. अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी गुपकर आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली आणि त्यानंतर वरील निर्णय जाहीर करण्यात आला.पंतप्रधानांनी पाठविलेले निमंत्रण आम्हाला मिळाले असून आम्ही सर्वपक्षीय बैठकीला हजर राहणार आहोत, असे डॉ. अब्दुल्ला यांनी आघाडीतील अन्य नेत्यांच्या उपस्थितीत स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरमधील राजकीय प्रक्रियेला गती देण्यासाठी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला जम्मू-काश्मीरमधील १४ नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर अशा प्रकारची बैठक प्रथमच होत आहे.आघाडीची भूमिका काय असेल, असे विचारले असता डॉ. अब्दुल्ला म्हणाले की, आमची भूमिका सर्वाना माहिती आहे, त्यामुळे ती परत सांगण्याची गरज नाही. जी भूमिका होती, तीच आहे आणि यापुढेही तीच राहील, असेही ते म्हणाले.