‘पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन’वर काँग्रेसने आणि नॅशनल कॉन्फरन्सने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आज भाजपने केली.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्याबद्दलचा गुपकार ठराबाबत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी केली. ‘पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन’ (पीएजीडी) हे नॅशनल कॉन्फरस आणि इतर पक्षाचे मिळून बनलेले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० पुर्नप्रस्थापित करून राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी पीएजीडीची आहे.

केंद्रीय मंत्री सिंह यांनी या पक्षांवर टीका केली आहे. ते म्हणाले, हे राजकीय पक्ष जम्मू भागातील लोकांशी शारीरिक भेदाभेद आणि मानसिक संघर्षांसाठी जबाबदार आहेत. ते या भागातील लोकांना मानसिक गुलामगिरीत ठेवू इच्छितात. ३७० हटवल्याने जम्मू-काश्मीरचे लोक पहिल्यांदा समान नागरिकत्त्वाचा अनुभव घेत आहेत. त्यांना मिळणारा दुय्यम दर्जा गळून पडला आहे.

काँग्रेस आणि नॅशनल काँन्फरन्सने हे स्पष्ट केले पाहिजे की, येथील जनतेला ते पुन्हा दुय्यम दर्जा देण्यासाठी गुपकार ठरावानुसार  कलम ३७० पुनस्र्थापित करायचे आहे. आज काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरंस डोग्रा लोकांचा सन्मान व्हावा म्हणून ओरडत आहे. पण, त्यांनी गेली अनेक वर्षे या लोकांना धोका दिला आहे.

काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरंस महाराजा हरिसिंह यांचा वापर करून नवीन पिढीची दिशाभूल करू इच्छित आहे. पण, वस्तुस्थिती अशी आहे की,  महाराज हरीसिंह यांना अपमानित करण्यास जवाहलाल नेहरू आणि शेख अब्दुला हे जबाबदार आहेत.

दरम्यान, भाजपने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना गुपकार ठरावाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे, तर पीडीपी महबूबा मुक्ती यांनी भारतीय तिरंगा फडकवणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.