राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला (आरजीसीटी) आठ वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारने दिलेली जमीन हरियाणातील मनोहरलाल खट्टर सरकार परत घेणार आहे. भाजप सरकारने राजीव गांधी ट्रस्टला डोळ्याच्या रूग्णालयासाठी देण्यात आलेली जमीन परत घेतली आहे. हरियाणाच्या नगरविकास विभागाने या जमिनीसाठी देण्यात आलेले ताबा प्रमाणपत्र रद्द केले आहे. ही जमीन काँग्रेसचे तत्कालीन भूपिंदरसिंह हुडा सरकारने दिली होती. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे राजीव गांधी ट्रस्टचे विश्वस्त आहेत.

सूत्रांनी दिलेल्या ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, नगरविकास विभागाने राजीव गांधी ट्रस्टला देण्यात आलेल्या जमिनीवर रूग्णालय बनवण्यात अपयश आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. राजीव गांधी ट्रस्टला ७ जानेवारी २०१२ पर्यंत रूग्णालय बांधायचे होते. नंतर त्यांना देण्यात आलेली मर्यादही वाढवण्यात आली होती. तरीही त्यांना रूग्णालय उभारण्या अपयश आले होते. त्यामुळे नगरविकास मंत्रालयाने त्यांचे ताबा प्रमाणपत्र रद्द केले. हरियाणा सरकारच्या पंचायत विभागाकडून ही जमीन पुन्हा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

सुमारे ४.८ एकर असलेली ही जमीन गुरूग्राम (गुडगाव) येथील उल्लवास गावात आहे. राजीव गांधी ट्रस्टला ही जमीन २००९ मध्ये लीज वर देण्यात आली होती. उल्लवास नगर पंचायतीच्या पंचायत विभागाने राजीव गांधी ट्रस्टला ही जमीन देण्यास परवानगी दिली होती. पंचायत विभागानेही भूमी अधिग्रहण प्रमाणपत्र रद्द करण्याची सूचना दिली असून पुढील कारवाई करण्याची परवानगीही दिली आहे.