बलात्कार प्रकरणी दोषी ठरलेले ‘डेरा सच्चा सौदा’चे गुरमित राम रहीम सिंग यांना तुरुंगात व्हीआयपी सुविधा दिल्याचे वृत्त आहे. बाबा राम रहीम सिंग यांना तुरुंगात एसी खोली ठेवण्यात आले आणि त्यांना एक मदतनीस देण्यात आला असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मात्र तुरुंग प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

१५ वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणात बाबा राम रहीम यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले. बाबा राम रहीमला हेलिकॉप्टरने रोहतकमधील तुरुंगात नेण्यात आले. बलात्कार प्रकरणातील दोषीला हेलिकॉप्टरने तुरुंगात नेल्याने आधीच नाराजी व्यक्त होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी हा निर्णय घेतला होता. आता तुरुंगातही बाबा राम रहीमला व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचे वृत्त आहे. तुरुंगात राम रहीमला एसी खोलीत ठेवण्यात आल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. खोलीत वॉटर प्यूरिफायर असून राम रहीम यांच्या मदतीसाठी एक सहाय्यकदेखील देण्यात आल्याचे समजते.

व्हीआयपी सुविधांचे वृत्त झळकताच कारागृह विभागाचे  महासंचालक के पी सिंग यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,बाबा राम रहीम हा आमच्यासाठी एक सामान्य कैदी आहे. ते सरकारी अतिथी गृहात नसून तुरुंगात आहेत. त्यांना एसी खोली देण्यात आलेली नाही, तसेच त्यांच्या मदतीसाठी सहाय्यकदेखील दिलेला नाही असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, बाबा राम रहीम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने राम रहीम यांचे दोन आश्रम ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. गुरमित राम रहीम सिंग यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात आणि जाळपोळीत झालेल्या नुकसानाची भरपाई ‘डेरा सच्चा सौदा’कडून घ्यावी असे आदेश पंजाब- हरयाणा हायकोर्टाने दिले होते. या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याचे समजते.