31 May 2020

News Flash

हरयाणात तणावपूर्ण शांतता, ‘डेरा सच्चा सौदा’चे ५५० समर्थक ताब्यात

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली

तणावाच्या पार्श्वभूमीवर गुरमित राम रहिम यांना रोहतकमधील तुरुंगात नेण्यात आले

बलात्काराप्रकरणी डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंग यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर हरयाणात उफाळलेला हिंसाचार शनिवारी सकाळी थांबला. शनिवारी सकाळपासून हरयाणा, पंजाबमध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी ‘डेरा सच्चा सौदा’च्या सुमारे ५०० समर्थकांना ताब्यात घेतले आहे.

दोन महिला अनुयायींवर बलात्कार केल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी गुरमित राम रहिम यांना दोषी ठरवले. या प्रकरणात सोमवारी गुरमित राम रहिम यांना शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. त्यांना सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘डेरा सच्चा सौदा’चे हजारो समर्थक रस्त्यावर उतरले. शुक्रवारी दुपारपासून हरयाणा आणि पंजाबमध्ये हिंसाचार उफाळला होता. वृत्तवाहिन्यांच्या दोन ओबी व्हॅनसह इतर वाहने, इमारती आणि रेल्वे स्थानकांना डेरा सच्चा सौदाच्या समर्थकांनी लक्ष्य केले होते. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या हिंसाचारात ३० जणांचा मृत्यू झाला होता.

शनिवारी सकाळी पंचुकलासह हरयाणामधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले. सकाळपासून हरयाणात तणावपूर्ण शांतता आहे. पंजाबमध्येही परिस्थिती नियंत्रणात आहे. ‘पंचकुलामधून डेरा सच्चा सौदा समर्थकांना बाहेर काढण्यात यश आले. अवघ्या १२ तासांमध्ये आम्ही परिस्थिती आटोक्यात आणली’ असा दावा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केला. पंचकुला आणि सिरसा येथे लष्कराची एक तुकडी तैनात करण्यात आली असून निमलष्करी दलाची अतिरिक्त तुकडीही तैनात करण्यात आली.  तर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. पोलिसांनी डेरा सच्चा सौदाच्या ५५० समर्थकांना ताब्यात घेतले असून ६२ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

हिंसाचारग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांनी शनिवारी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी संवाद साधला. ‘काल जे झालं ते खूप वाईट होतं. एका व्यक्तीला दोषी ठरवले जाते आणि जमाव रस्त्यावर तोडफोड करतो. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे चुकीचे होते’ अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर गुरमित राम रहिम यांना रोहतकमधील तुरुंगात नेण्यात आले. या तुरुंगाजवळ पोहोचणे डेरा सच्चा समर्थकांना कठीण असल्याने सरकारने हा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2017 10:14 am

Web Title: gurmeet ram rahim singh rape case conviction updates punjab haryana situation panchkula cm manohar lal khattar
टॅग Haryana,Punjab
Next Stories
1 जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद
2 आधार- पॅनकार्ड जोडणीची अंतिम मुदत कायम
3 पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या ताब्यात जाण्याची अमेरिकेला भीती
Just Now!
X