बाबा राम रहिमची दत्तक कन्या हनीप्रीत इन्साला अखेर मंगळवारी अटक करण्यात आली. ३८ दिवस पोलिसांना चकवा देणाऱ्या हनीप्रीतला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. दुपारी हनीप्रीतला हरयाणा पोलिसांच्या ताब्यात दिले.

‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा राम रहिमला बलात्कार प्रकरणात पंचकुलातील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर हरयाणा आणि पंजाबमध्ये हिंसाचार उफाळला होता. हनीप्रीत, डेराचा प्रवक्ता आदित्य इन्सा आणि अन्य पदाधिकाऱ्यांवर हिंसाचार पसरवल्याचा आरोप आहे. याप्रकरणात हनीप्रीतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या ३८ दिवसांपासून पोलीस हनीप्रीतचा शोध घेत होते. मात्र पोलिसांचा चकवा देण्यात ती यशस्वी ठरली होती. याच कालावधीत हनीप्रीतने अटक टाळण्यासाठी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तिचा अर्ज हायकोर्टाने फेटाळून लावला होता. हनीप्रीतने न्यायालयासमोर हजर होणे हाच सोपा मार्ग असल्याचे हायकोर्टाने सांगितले होते.हिंसाचाराप्रकरणी ४३ मोस्ट वाँटेड गुन्हेगारांची यादी हरयाणा पोलिसांनी जाहीर केली होती. यात हनीप्रीत आणि आदित्य इन्सा या दोघांची नावे अग्रक्रमावर होती.

दरम्यान, मंगळवारी हनीप्रीतने ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हनीप्रीतने पोलिसांना शरण जाण्याचे संकेत दिले होते. मी नेपाळला गेले नव्हते, मी भारतातच होते, असे तिने मुलाखतीत सांगितले होते. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही. सत्याचाच विजय होईल असे तिने म्हटले होते. बाप आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासण्यात आला आहे. माध्यमांतून बाप आणि मुलीचे नाते अत्यंत चुकीच्या पद्धतीने जगासमोर दाखवले गेले असा आरोप तिने केला होता.