वादविवादापासून दूर राहण्यासाठी गुरमेहर कौरने दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त फर्स्टपोस्टने दिले आहे.  गुरमेहरने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केल्यानंतर तिला सातत्याने धमक्या मिळत होत्या. क्रिकेटपटू, कलाकार या सर्वांनी तिची सोशल मिडियावर खिल्ली उडवली होती. गेल्या काही दिवसांपासून वादाचा केंद्रबिंदू ती बनली होती. या सर्व गोष्टींमुळे तिने दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी तिने ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए) च्या निषेध मोर्चामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. आपल्याला जे काही बोलायचे होते, जे काही सांगायचे होते ते आपण सांगितले आहे. कृपया आता मला एकटे राहू द्या असे म्हणत तिने या वादातून माघार घेतली. तिच्या या निर्णयाला प्राध्यापकांनी समर्थन दिले आहे. एआयएसएने आयोजित केलेल्या मोर्चातून मी माघार घेत आहे. या वयात जे काही सहन करण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे ते सर्वकाही मी सहन केले आहे,असे गुरमेहरने म्हटले. हे आंदोलन माझ्यापुरते मर्यादित नाही. तुम्ही सर्वांनी या आंदोलनाला जावे असे मला वाटते. या मोर्चाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावावी असे तिने म्हटले. या मोर्चासाठी माझ्याकडून शुभेच्छा असे गुरमेहरने म्हटले आहे.

हा निर्णय आपण कुणाला घाबरुन घेतला नसल्याचे तिने म्हटले आहे. मी माझा खंबीरपणा या आधीच दाखवला आहे. जे लोक हिंसाचाराला पाठिंबा देतात त्यांच्याविरोधात मी उभी राहिले. यापुढे, हिंसाचाराला पाठिंबा देण्यापूर्वी किमान एक वेळा तरी हे लोक विचार करतील. हेच मला अपेक्षित होते असे तिने म्हटले. रामजस महाविद्यालयामध्ये एआयएसए आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांची मारहाण झाली. त्यानंतर तिने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने असे लिहिले होते, की मी दिल्ली विद्यापीठात शिकते आणि मी अभाविपला घाबरत नाही. मी एकटी नसून माझ्यासोबत अनेक जण आहेत. सर्व देश माझ्याबाजूने आहे. अभाविप कार्यकर्ते हिसेंचा जो वापर करतात तो त्यांनी थांबवावा. हा केवळ एखाद्या व्यक्तीवर हल्ला नसून हा लोकशाहीवर हल्ला आहे असे तिने म्हटले होते.

तिच्या या पोस्टनंतर तिच्यावर टीकेचा भडिमार करण्यात आला. तर काही जणांनी तिचे समर्थन देखील केले होते. त्यानंतर हा वाद चिघळला. रॉबर्ट वढेरा, अरविंद केजरीवाल यांनी तिला समर्थन दिले आहे. तर, तिच्या मनात कोण विष कालवत असा प्रश्न गृह राज्य मंत्री किरेन रिजीजू यांनी उपस्थित केला होता. क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने देखील गुरमेहरच्या पोस्टची खिल्ली उडवणारी एक पोस्ट टाकली होती. त्यावर ही प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.