फेसबुक आणि व्हॉट्स अॅपच्या आहारी गेलेल्या पत्नीची पतीने हत्या केल्याची घटना गुरुग्राममध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी हरीओम (वय ३५) या तरुणाला अटक केली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

गुरुग्राममध्ये राहणाऱ्या हरीओमचा २००६ मध्ये लक्ष्मी (वय ३२) या तरुणीशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. गुरुवारी रात्री हरीओमचा पत्नीशी वाद झाला. रागाच्या भरात त्याने पत्नीची हत्या केली. शुक्रवारी सकाळी लक्ष्मीचे वडील बलवंत सिंग त्यांच्या घरी आले असता त्यांना बेडवर मुलीचा मृतदेह दिसला आणि त्याच्या बाजूला हरीओम बसून होता. त्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी हरीओमला अटक केली असून पोलीस चौकशीत त्याने पत्नीची हत्या का केली याचा उलगडा झाला आहे.

‘२००६ मध्ये लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही वर्ष सगळं चांगलं सुरु होतं. दोन वर्षांपूर्वी मी तिला स्मार्टफोन घेऊन दिला. या एका फोनने ती बदलूनच गेली. तिने माझ्याकडे आणि दोन मुलांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. ती दिवसरात्र फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवरच असायची, असे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. लक्ष्मी इतकी फेसबुक, व्हॉट्स अॅपच्या आहारी गेली होती की तिने घरात स्वयंपाक करणे बंद केले. ती शाळेत मुलांना घेऊन जायची नाही ना ती घरात काही काम करायची, असे हरीने पोलिसांना सांगितले.

मी आधी याकडे दुर्लक्ष केले. ती हळूहळू स्मार्टफोनला कंटाळेल, असे मला वाटायचे. पण परिस्थिती आणखी बिघडत गेली. आमच्यात दररोज वाद व्हायचे. मुलांचेही हाल होत होते. शेवटी मी त्यांना कुरुक्षेत्रमधील बॉर्डिंग स्कूलमध्ये टाकले, असेही त्याने पोलीस चौकशीत सांगितले.
‘लक्ष्मीचे अनैतिक संबंध असावेत, असा संशय माझ्या मनात येऊ लागला. गुरुवारी रात्री यावरुनच आमच्यात वाद झाला आणि मी तिची हत्या केली’, अशी कबुली त्याने दिली. लक्ष्मीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हरीओमविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत हरीओमने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, असे पोलिसांनी सांगितले.